लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : जेसन होल्डरच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत झोकात सुरुवात केली. गोलंदाजांचा टिच्चून मारा आणि क्षेत्ररक्षक व फलंदाजांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाच्या जोरावर विंडीजने पहिल्या सामन्यात पाकिस्तानला लोळवलं. पाकचा संपूर्ण संघ 105 धावांत गुंडाळून विंडीजने हे लक्ष्य 13.4 षटकांत तीन विकेटच्या मोबदल्यात पार केले. या विजयात महत्त्वाचा वाटा उचलणारा गोलंदाज जायबंद झाला असून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली. 218 चेंडू राखून विंडीजने मिळवलेला हा वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
या सामन्यातून जवळपास 10 महिन्यांनी राष्ट्रीय संघात परतलेल्या आंद्रे रसेलने दमदार कामगिरी केली. त्याने पाकिस्तानला सुरुवातीलाच धक्के देत विंडीजच्या विजयाचा पाया रचला. पण, या सामन्यात रसेलला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. सामन्यादरम्यान त्याने वैद्यकीय मदतही घेतली. त्याने 4 षटकंच टाकली आणि त्यात चार धावा देत दोन विकेटही घेतल्या. ''रसेलला प्राथमिक उपचार घ्यावे लागले होते. पुढील काही दिवस त्याच्या दुखापतीवर आम्ही नजर ठेवून असणार आहोत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो तंदुरूस्त होईल, अशी खात्री आहे. रसेलला नक्की काय झालं, हे मीही 100 टक्के खात्रीनं सांगू शकत नाही,''असे मत विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरने व्यक्त केले.
विंडीजने 14 षटकांतच सामना जिंकल्यामुळे रसेलला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. तो म्हणाला,'' गेला वर्षभर मी गुडघ्याच्या दुखापतीनी त्रस्त आहे. काही वेळा या वेदना असह्य होतात, परंतु मी एक व्यावसायिक क्रिकेटपटू आहे. त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी काय करायचे, हे मला माहीत आहे. माझ्याकडे पाच दिवसांचा कालावधी आहे आणि मी तोपर्यंत पूर्णपणे तंदुरूस्त होईन.''