लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पावसाच्या व्यत्ययामुळे ऑस्ट्रेलिया-बांगलादेश यांच्यातील सामना ४९व्या षटकात थांबवण्यात आला. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने पाच फलंदाजांच्या मोबदल्यात ३६८ धावा केल्या होत्या. वॉर्नरने धावांचा पाऊस पाडल्यावर वरुण राजाला स्वत:ला आवरता आले नाही आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाचे फक्त एक षटक शिल्लक असताना जोरदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे खेळ थांबवावा लागला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १२१ धावांची सलामी दिली. त्यानंतर फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंचने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या.
फिंच असताना आणि बाद झाल्यावरही वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये कसलाच फरक जाणवला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांवर वॉर्नर कायम तुटून पडत होता. वॉर्नरने यावेळी यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घायायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात फटक्यांचा धडाकाच लावला होता. वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
वॉर्नरला यावेळी उस्मान ख्वाजानेही चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाने या सामन्यात ७२ चेंडूंत १० चौकारांसह ८९ धावा केल्या.
वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजीचा नमुना पेश केला. मॅक्सवेलने फक्त १० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली होती. बांगलादेशकडून सौम्य सरकारने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.
Web Title: ICC World Cup 2019: Australia-Bangladesh match stopped due to rain
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.