लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. इंग्लंडचे पुन्हा एकदा पराभवाचे पाढेच पाहायला मिळाले. गेल्या सामन्यात इंग्लंडला श्रीलंकेना पराभूत केले होते. यापूर्वी इंग्लंडला पाकिस्ताननेही पराभूत केले होते. विश्वचषकातील इंग्लंडचा हा तिसरा पराभव ठरला.
आरोन फिंचच्या शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 285 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग इंग्लंडला करता आला नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहनडरहॉफने यावेळी इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला, तर मिचेल स्टार्कने चार विकेट्स मिळवले. या विजयासह ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
शतकी सलामी नंतर ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांचा टप्पा गाठेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण फिंचच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 285 धावांवर समाधान मानावे लागले.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. या गोष्टीचा फायदा फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांनी चांगलाच उचलला. या दोघांनी १२३ धावांची सलामी देत इंग्लंडच्या गोलंदाजीची हवा काढून टाकली. पण त्यानंतर वॉर्नर ५३ धावांवर बाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर काही वेळात फिंचने शतक झळकावले. फिंचने ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०० धावा केल्या, पण शतकानंतर त्याला एकही धाव करता आली नाही.
फिंच बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाची ३६ षटकांमध्ये ३ बाद १८५ अशी स्थिती होती. यावेळीही ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते. पण फिंच बाद झाल्यावर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना तिनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही.