लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. डेव्हिड वॉर्नरच्या १६६ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ३८१ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशने तिनशे धावांचा उंबरठा ओलांडला खरा, पण त्यांना विजय मात्र मळवून देता आला नाही. बांगलादेशकडून मुशफिकर रहिमने शतक झळकावले, तर तमीम इक्बाल आणि महमुदुल्लाह यांनीही अर्धशतके झळकावली, पण सामना जिंकण्यात मात्र ते अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाने हा सामना 48 धावांनी जिंकला.
बांगलादेशच्या गोलंदाजीचे डेव्हिड वॉर्नरने पिसे काढल्याचेच आज पाहायला मिळाले. वॉर्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात 381 धावांचा डोंगर उभारता आला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १२१ धावांची सलामी दिली. त्यानंतर फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंचने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या.
फिंच असताना आणि बाद झाल्यावरही वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये कसलाच फरक जाणवला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांवर वॉर्नर कायम तुटून पडत होता. वॉर्नरने यावेळी यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घायायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात फटक्यांचा धडाकाच लावला होता. वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजीचा नमुना पेश केला. मॅक्सवेलने फक्त १० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली होती. बांगलादेशकडून सौम्य सरकारने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.