लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेवर सहज विजय मिळवत ऑस्ट्रेलियाने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. आरोन फिंचच्या दीडशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३३४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची दमदार सुरुवात झाली. पण श्रीलंकेची सलामीची जोडी फुटली आणि श्रीलंकेचा डाव गडगडला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा डाव २३७ धावांवर संपुष्टात आणला आणि ८७ धावांनी सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने आठ गुणांसह अव्वल स्थान गाठले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ३३५ धावांचा पाठलाग करताना दिमुथ करुणारत्ने आणि कुशल परेरा यांनी ११५ धावांची दमदार सलामी दिली. पण परेरा बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेचे फलंदाज बाद होत गेले. करुणारत्नेही ९७ धावांवर बाद झाला आणि त्यानंतर श्रीलंकेचा डाव कोसळला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक चार बळी टिपले.
विश्वचषकातील काही सामन्यांमध्ये पावसाने झोडपल्याचे पाहायला मिळाले. पण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंचने आज श्रीलंकेच्या गोलंदाजीला झोडपल्याचे पाहायला मिळाले. फिंचच्या दिडशतकी खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करताना ३३४ धावांचा डोंगर उभारता आला.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पण फिंचने श्रीलंकेचा हा निर्णय चुकीचा असल्याचे दाखवून दिले. डेव्हिड वॉर्नरच्या साथीने खेळताना फिंचने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. फिंच आणि वॉर्नर (२६) या जोडीने ८० धावांची सलामी दिली. वॉर्नर बाद झाल्यावर उस्मान ख्वाजाला (१०) मोठी खेळी साकारता आली नाही. पण त्यानंतर फलंदाजीला आलेल्या स्टीव्हन स्मिथबरोबर (७३) फिंचची जोडी चांगलीच जमली.
फिंच आणि स्मिथ या जोडीने श्रीलंकेच्या गोलंदाजांचा खरपूर समाचार घेत चौथ्या विकेटसाठी १७४ धावांची भागीदारी रचली. फिंचने ४२.४ षटके खेळपट्टीवर होता आणि या दरम्यान त्याने धडाकेबाज फलंदाजीचा नमुना पेश केला. फिंचने १३२ चेंडूंत १५ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १५३ धावांची दणदणीत खेळी साकारली. फिंचच्या या दीडशतकी खेळीच्या जोरावरच ऑस्ट्रेलियाला तिनशे धावांचा पल्ला सहज गाठता आला.