Join us  

ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा 'स्पेशल' सराव, पाहा व्हिडीओ

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला योग्य वेळी लय सापडली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्यांनी भारत आणि पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका जिंकून आत्मविश्वास कमावला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 2:49 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला योग्य वेळी लय सापडली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर त्यांनी भारत आणि पाकिस्तानविरुद्धची वन डे मालिका जिंकून आत्मविश्वास कमावला आहे. त्यात स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन हुकुमी एक्के संघात परतल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपदाच्या शर्यतीत आला आहे. वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाचा अंदाज बांधणे अवघडच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास ऑसी संघ कधीही पलटवार करू शकतो. त्याला कारणही तसेच आहे. महत्त्वाच्या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून केली जाणारी खास तयारी. इंग्लंडच्या पाटा खेळपट्ट्यांचा सामना करण्यासाठीही ऑस्ट्रेलियाने स्पेशल सराव सुरू केला आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत फलंदाजांना पोषक अशी खेळपट्टी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही स्पर्धा धावांचा धो धो पाऊस पाडणारी ठरली, तर आश्चर्य वाटायला नको. प्रत्येक संघही त्याच दृष्टीनं तगड्या फलंदाजांची फौज घेऊन लंडनमध्ये दाखल होत आहेत. पण, ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजांबरोबरच गोलंदाजीवरही भर देताना दिसत आहे. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, अॅरोन फिंच, उस्मान ख्वाजा, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस हे तगडे फलंदाज संघात असताना ऑसींनी गोलंदाजी विभागाकडे दुर्लक्ष केलेले नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांच्या धावांवर अंकुश बसवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने विशेष रणनीती आखली आहे आणि त्यानुसार त्यांचा सरावही सुरू आहे.

गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सराव करत आहेत. अखेरच्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाची धावगती कशी रोखावी यासाठी गोलंदाजांना नवा धडा गिरवावा लागत आहे.  गोलंदाज अचून यॉर्कर मारा करण्यावर भर देताना दिसत आहेत. त्यांना चेंडूचा टप्पा ठरवण्यासाठी एक टार्गेट देण्यात आले आहे. मिचेल स्टार्कने याबाबत सांगितले. ''ही टार्गेट गोलंदाजी आहे. स्टम्प आणि वाईड साईटला आम्ही काही कॉईन्स ठेवले आहेत आणि त्यावरच  चेंडूचा मारा करण्याचा सराव करत आहोत. डेथ बॉलिंगमध्ये टिच्चून मारा करण्यासाठी हे महत्त्वाचे आहे,''असे स्टार्कने सांगितले.

2015च्या वर्ल्ड कप स्पर्धेत स्टार्कने त्याच्या वेगाने, स्वींग यॉर्करने सर्वांचा अचंबित केले होते. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची जबाबदारी त्याच्यावरच असणार आहे. फेब्रुवारी 2018 नंतर त्याने केवळ चारच वन डे सामने खेळले आहेत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने लय प्राप्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 1 जूनला अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे. 

टॅग्स :वर्ल्ड कप 2019आॅस्ट्रेलिया