ब्रिस्टॉल : गोलंदाजांनी माफक धावसंख्येत रोखल्यानंतर डेव्हिड वॉर्नर (नाबाद ८९) व अॅरॉन फिंच (६६) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. अफगाणिस्तानने विजयासाठी दिलेले २०८ धावांचे आव्हान त्यांनी ३४.५ षटकांत पार केले.विजयासाठी २०८ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या आॅस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी सुरुवातीला कोणतही गडबड केली नाही. अॅरॉन फिंच याने सुरुवातीला आक्रमक पावित्रा घेतला होता. त्याने ४९ चेंडूत ६ चौकार व ६ षटकाराच्या साह्याने ६६ धावा केल्या. गुलबदीनने त्याला बाद केले.
सुरुवातीला संथ खेळणाऱ्या वॉर्नरने स्थिरावल्यानंतर फटकेबाजी करण्यास प्रारंभ केला. उस्मान ख्वाजा याला आज चमक दाखवता आली नाही. त्याने २० चेंडूत १५ धावा केल्या. वॉर्नरने ११४ चेंडूत ८ चौकारासह ८९ धावा केल्या. स्मिथने १८ धावा केल्या. जिंकण्यासाठी तीन धावा गरजेच्या असताना स्मिथ बाद झाला. मॅक्सवेलने चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला. अफगाणिस्तानकडून गुलबदीन व राशीद खान याने प्रत्येकी एक बळी मिळवला.तत्पुर्वी नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शहजाद व हजरतुल्ला झझाई या दोघांनाही शून्यावर बाद केले.
यानंतर मात्र रहमत शाह याने आणखी पडझड होऊ दिली नाही. त्याने ६० चेंडूंत ६ चौकारांसह ४३ धावा केल्या. हमिदुल्ला शाहिदी (१८) व मोहम्मद नबी (७) यांना झटपट बाद करत अफगाणिस्तानला ऑस्ट्रेलियाने आणखी अडचणीत आणले. नबी धावबाद झाला, तर शाहिदीला झम्पाने बाद केले.गुलबदीन याने ३३ चेंडूंत झटपट ३० धावा केल्या. नजीबुल्लाहने चौफेर फटकेबाजी करत ४९ चेंडूंत सात चौकार व दोन षट्कारांच्या साह्याने ५१ धावा केल्या.
राशीद खानने दोन चौकार व तीन षट्कारांच्या साह्याने ११ चेंड्ूत २७ धावा केल्या. अफगाणिस्तानचा डाव ३८.२ षटकांत २०७ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून झम्पा व कमिन्स यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले.