Join us  

ICC World Cup 2019 : बांगलादेशची सर्वोत्तम कामगिरी; दक्षिण आफ्रिकेला केले बेजार! 

वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 6:49 PM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : आशियाई टायगर म्हणून ओळख असलेल्या बांगलादेश संघाने रविवारी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना हैराण केले. आफ्रिकेने दिलेले प्रथम फलंदाजीचे आव्हान स्वीकारत बांगलादेशच्या आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार यांच्या दमदार सलामीनंतर अनुभवी शकिब अल हसन आणि मुशफीकर रहमान यांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यानंतर अन्य फलंदाजांनी हातभार लावत बांगलादेशला 6 बाद 330 धावांचा पल्ला गाठून दिला. वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेशची ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली आहे. 

नाणेफेक जिंकून आफ्रिकेने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यांचे हे आव्हान स्वीकारत बांगलादेशने सकारात्मक सुरुवात केली. इक्बाल व सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. नवव्या षटकात फाहलेक्वायोने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने क्विंटन डी'कॉककरवी इक्बालला ( 16) झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 15 धावांची भर घालून सरकारही माघारी परतला. ख्रिस मॉरिसने त्याला 42 धावांवर बाद केले. 

त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. बांगलादेश संघाने दोन विकेट गमावून 200 धावा जेव्हा जेव्हा केल्या तेव्हा त्यांची जयपराजयाची आकडेवारी ही 19-5 अशी राहिली आहे. त्यामुळे आफ्रिकेच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद मिथून ( 21) माघारी परतला. मुशफिकर एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची ही घोडदौड फेहलुक्वायोनं रोखली. 43व्या षटकात फेहलुक्वायोनं 78 धावा करणाऱ्या मुशफिकरला बाद केले.

बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेत दुसऱ्यांदा तीनशे धावांचे शिखर उभे केले आहे. याआधी त्यांनी 2015 मध्ये स्कॉटलंडविरुद्ध 315 धावांची कामगिरी केली होती. दुसरीकडे आफ्रिकेने 14व्यांदा 300 पेक्षा अधिक धावा करण्याची संधी प्रतिस्पर्धी संघाला दिली आहे आणि त्यांना केवळ एकच विजय मिळवता आलेला आहे. महमदुल्लाहने नाबाद 46 धावांची खेळी केली.  

टॅग्स :वर्ल्ड कप 2019बांगलादेशद. आफ्रिका