लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आपली धमक दाखवून दिली. त्यांना हलक्यात घेण्याची चूक किती महागात पडू शकते, याचे प्रात्याक्षिक दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दिसले. बांगलादेशने दमदार फलंदाजी आणि चतूर गोलंदाजीच्या जोरावर आफ्रिकेला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. वन डे क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या उभारून बांगलादेशने इतिहास घडवला. शिवाय त्यांनी चोकर्स आफ्रिकेला नमवून अन्य संघांना इशारा दिला. बांगलादेशने हा सामना 21 धावांनी जिंकला. बांगलादेशच्या या अविश्वसनीय विजयाने वर्ल्ड कप स्पर्धेत खऱ्या अर्थाने चुरस निर्माण केली आहे. बांगलादेशच्या 330 धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने 309 धावा केल्या.
तमीम इक्बाल व सौम्या सरकार यांनी पहिल्या विकेटसाठी 60 धावा जोडल्या. नवव्या षटकात फाहलेक्वायोने बांगलादेशला पहिला धक्का दिला. त्याने क्विंटन डी'कॉककरवी इक्बालला ( 16) झेलबाद केले. त्यानंतर अवघ्या 15 धावांची भर घालून सरकारही माघारी परतला. ख्रिस मॉरिसने त्याला 42 धावांवर बाद केले. त्यानंतर शकिब व मुशफिकर यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी केली. वर्ल्ड कप स्पर्धेतील ही बांगलादेशच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. इम्रान ताहीरने ही जोडी तोडली. त्याने शकिबला 75 धावांवर बाद केले. त्यानंतर मोहम्मद मिथून ( 21) माघारी परतला. मुशफिकर एका बाजूनं खिंड लढवत होता, परंतु त्याची ही घोडदौड फेहलुक्वायोनं रोखली. 43व्या षटकात फेहलुक्वायोनं 78 धावा करणाऱ्या मुशफिकरला बाद केले. महमदुल्लाहने नाबाद 46 धावांची खेळी केली. बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने सावध सुरुवात केली. हाशिम अमलाच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या एडन मार्कराम आणि क्विंटन डी'कॉक यांनी चांगला खेळ केला. पण, दहाव्या षटकात ताळमेळ जमलेल्या जोडीचं फिसकटलं आणि हो-नाय च्या चक्करमध्ये पाच सेकंदात डी'कॉकला माघारी परतावे लागले. मुशफिकर रहिमने त्याला धावबाद केले. त्यानंतर मार्करामने कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसच्या सोबत संघाचा डाव सावरला. पण, शकिब अल हसनने त्यालाही माघारी पाठवले आणि विक्रमाला गवसणी घातली. ड्यू प्लेसिसने अर्धशतकी खेळी करताना आफ्रिकेच्या विजयाच्या पल्लवीत केला. मेहिदी हसन मिराजने त्याचा त्रिफळा उडवला.डेव्हिड मिलर आणि व्हॅन डेर ड्यूसेन या जोडीनं चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना बांगलादेशच्या गोटात चिंता निर्माण केली. बांगलादेशच्या खेळाडूंनी या दोघांनाही जीवदान दिले. पण, मुस्ताफिजूर रहमानने ही जोडी तोडली. त्यानं मिलरला 38 धावांवर मेहिदी हसनकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. ड्यूसेनने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली, परंतु ऐन मोक्याच्या वेळी त्याची विकेट गेली. मोहम्मद सैफुद्दीनने त्याला त्रिफळाचीत केले. ड्यूसेन 41 धावांवर माघारी परतला. आफ्रिकेला अखेरच्या 10 षटकांत विजयासाठी 103 धावांची गरज होती. त्यामुळे संपूर्ण मदार अनुभवी जेपी ड्युमिनीच्या खांद्यावर आली. पण, सैफुद्दीनने आफ्रिकेला आणखी एक धक्का देत त्यांच्या विजयाच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला. फेहलुक्वायो 8 धावांवर माघारी परतला. ख्रिस मॉरिसही ( 10) लवकर माघारी परतल्याने आफ्रिकेचा पराभव जवळपास निश्चित झाला होता. बांगलादेशने शेवटच्या चार षटकांत 54 धावा चोपल्या होत्या आणि आफ्रिकेला विजयासाठीही 24 चेंडूंत 55 धावांची गरज होती. पण, त्यांच्याकडे त्या ताकदीचा फलंदाज नव्हता. ड्यूमिनीच्या विकेटने बांगलादेशचा विजय पक्का केला. ड्यूमिनीने 37 चेंडूंत 45 धावा केल्या.