लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : चार वर्ष इंग्लंडच्या स्थानिक क्रिकेटमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या जोफ्रा आर्चरला अखेरीस त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं. आगामी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी इंग्लंडने मंगळवारी त्यांचा अंतिम 15 जणांचा संघ जाहीर केला आणि त्यात अनपेक्षितरित्या जोफ्राला संधी देण्यात आली. डेव्हिड विलीच्या तुलनेत जोफ्राचा अनुभव तो काय ? त्याला का संधी मिळाली? असे अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात नक्की आले असतील. पण, क्रिकेटच्या मैदानावर त्याच्यातील दिसणारा आत्मविश्वास हा खूप बोलका आहे. म्हणून त्याचे कर्तृत्व काहीच नाही असे बोलणे चुकीचे ठरेल.
बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या जोफ्राला वर्ल्ड कप संघात स्थान न दिल्यास इंग्लंडची मोठी चूक ठरेल, असे विधान अनेक माजी खेळाडूंनी केले होते. त्यातूनच हा किती उपयुक्त खेळाडू आहे, याची प्रचिती येते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या पात्रता निकषात बदल केल्यामुळे हे शक्य झाले. नियमानुसार इंग्लंडमध्ये न जन्मलेला, परंतु येथे तीन वर्ष वास्तव्यास असलेला खेळाडू इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. याआधी वास्तव्याची अट सात वर्ष होती. नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून होणार झाली.
23 वर्षीय आर्चर 2015 पासून ससेक्स क्लबचे प्रतिनिधित्व करतो आणि जगातील बऱ्याच ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 7.2 कोटी रुपयांत चमूत दाखल करून घेतले होते. आर्चर हा बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो. त्याने ऑक्टोबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने ब्रिटीश पासपोर्ट मिळवले आणि 2015 साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 28 सामन्यांत 131 विकेट्स घेतल्या आहेत, शिवाय 1003 धावाही कुटल्या आहेत.
जोफ्राने 3 मे ला आयर्लंडविरुद्ध इंग्लंडच्या वन डे संघात पदार्पण केले. तर इंग्लंडकडून पहिला ट्वेंटी-20 सामना 5 मेला पाकिस्तानविरुद्ध खेळला.
(ICC World Cup 2019 : इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघात महत्त्वाचे बदल; जोफ्रा आर्चरची लॉटरी!)