मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताच्या वर्ल्ड कप संघातील महत्त्वाचा खेळाडू केदार जाधवच्या दुखापतीबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल) चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व करताना केदारला दुखापत झाली होती. केदारच्या तंदुरुस्तीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात किंवा भारतीय संघ लंडनसाठी रवाना होईल त्याच्या आदल्या दिवशी घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे केदारचं वर्ल्ड कप तिकीट अजून वेटिंगवरच आहे. केदारला रिप्लेसमेंट म्हणून दोन खेळाडूंना तयार राहायला सांगितले आहे.
Cricketnext च्या माहितीनुसार बीसीसीआय केदारच्या तंदुरुस्तीवर बारीक लक्ष ठेवून आहे. केदार वर्ल्ड कपला जाणार की नाही, यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल. तो तंदुरुस्त होईल की नाही, हेही आता सांगू शकत नाही. मात्र, पुढील आठवड्यात किंवा लंडनला रवाना होण्यापूर्वी त्याच्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. भारतीय संघात 23 मे पर्यंत बदल करता येऊ शकतो. केदारला रिप्लेसमेंट म्हणून अंबाती रायुडू व अक्षर पटेल यांना तयार राहायला सांगितले आहे.
अष्टपैलू खेळाडू केदारला खांद्याच्या दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात 14 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डीप स्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली. निकोलस पूरणने टोलावलेला चेंडू अडवण्यासाठी केदारने डाइव्ह मारली. केदारने चेंडू अडवला, परंतु खांदा दुखावल्याने तो मैदानावर तसाच उभा राहिला. त्यानंतर जाधवने मैदान सोडले. संपूर्ण सामन्यात जाधव नंतर क्षेत्ररक्षणाला आलाच नाही. वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर केदारला झालेली दुखापत ही भारतीय संघासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
केदारच्या जागी कोणाला संधी?केदार दुखापतीतून न सावरल्यास त्याच्या जागी पाच खेळाडूंच्या नावांची चर्चा आहे. रिषभ पंत, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. तत्पूर्वी, भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध अनुक्रमे 25 व 28 मे रोजी सराव सामना खेळणार आहे.