- स्वदेश घाणेकर
वर्ल्ड कप तर आमचाच आहे... फक्त इंग्लंडमध्ये जायचंय आणि तो चषक उचलून आणायचा आहे... असे स्वप्न पाहणारे काल तोंडघशी पडले. विराट कोहली या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारत वर्ल्ड कप जिंकेल, याही स्वप्नांचा काल चुराडा झाला. असं व्हायला नको होतं. गेली दोन वर्ष आपण परदेशात वन डे मालिका गाजवल्या होत्या आणि त्यामुळेच संघाकडून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण, भारतीय संघातील कमकुवत बाब उघड होती आणि त्यानेच संघाचा घात केला.
भारतीय संघाने परदेशात मिळवलेले यश हे गोलंदाज व आघाडीच्या तीन फलंदाजांच्या जोरावर होते, त्यामुळे मधल्या फळीला फार काही चमक दाखवण्याची किंवा दडपणात खेळ करण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. चौथ्या क्रमांकावर कोण हा प्रश्न वर्ल्ड कप स्पर्धेनंतरही अनुत्तरीत राहिला. अंबाती रायुडूला डावलून विजय शंकरला देण्याचं दाखवलेलं धाडस अपयशी ठरलं. त्यानंतर रिषभ पंत आणि अनुभवी दिनेश कार्तिक यांचा पर्यायही अयोग्य ठरला. काल याच कमकुवत बाबीनं भारतीय संघाला अपयशाला सामोरे जावे लागले.
न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत 240 धावांचे लक्ष्य हे भारतासाठी फार अवघड नव्हते. रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि विराट कोहली या तिघांनीच ते सहज पार केले असते. पण, हा खेळ केवळ 'स्टार' खेळाडूंवर नाही, तर सांघिक कामगिरीवर खेळला जातो, याचा विसर आपल्याला पडला होता. त्याची जाण किवींनी करून दिली. रोहित, लोकेश व कोहली तिघेही प्रत्येकी एक धाव करून तंबूत परतले. त्यामुळे कठीण प्रसंगाला कधी सामोरं न गेलेल्या मधल्या फळीची त्रेधातिरपीट उडाली. येथेही महेंद्रसिंग धोनीला सातव्या क्रमांकासाठी राखून ठेवण्याचा निर्णय अंगलट आलाच.. पंत जो केवळ 21 वर्षांचा आहे त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय घेत प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नेमकं काय सुचवायचे होते हेच कळाले नाही.
अनुभवाचा विचार केल्यास त्याच्या जागी धोनी किंवा फार तर दिनेश कार्तिक येणं अपेक्षित होतं. कार्तिकनेही फार दिवे लावले असेही झाले नाही. पंत व हार्दिक पांड्या यांना कठीण समयी खेळ कसा उंचवावा हे गणितच जमलं नाही. या दोघांची भागीदारी चांगलीच सुरू होती, पण ट्वेंटी-20 फॉरमॅटमधील या स्टार्सना वन डेत टिकून खेळावं लागतं, हेच माहित नसावं. त्यामुळेच चुकीच्या वेळी चुकीचा फटका मारण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही आणि येथेच भारताच्या हातून सामना निसटला.
रविंद्र जडेजा व धोनी यांच्या 116 धावांच्या भागीदारीनं आशा पल्लवीत केल्या. पण, तोपर्यंत चेंडू व धावा यांतील अंतर प्रचंड वाढले होते आणि विकेट हाती नसताना जोखीम उचलणे त्या क्षणी अवघडच होते. तरीही या अनुभवी खेळाडूंनी हा सामना आणला. हेच काम जर मधल्या फळीच्या फलंदाजांनी केले असते तर सामन्याचा निकाल भारताच्या बाजूनं असता. संघ हरला की टीका ही होणारच, परंतु त्यातून शिकावं हीच अपेक्षा आहे. गेली 3-4 वर्ष भारतीय संघ मधल्या फळीवर तोडगा काढू शकलेला नाही. या पराभवानंतर तरी त्याचा गांभीर्यानं विचार व्हावा आणि त्या दृष्टीनं पाऊल उचलावे, ही अपेक्षा.
गोलंदाजांचे विशेष कौतुक
जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाज का आहे, याची प्रचिती वर्ल्ड कपमध्ये आलीच. त्यानं विकेट घेतल्या शिवाय प्रतिस्पर्धींच्या धावांवरही अंकुश ठेवला. भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यासह हार्दिक पांड्या यानेही आपापली जबाबदारी चोख पार पाडली. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यात चहलनं बाजी मारली. कुलदीपला फार काही कमाल करता आली नाही. रविंद्र जडेजा हा सरप्राईज पॅकेज ठरला. त्यानं गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही विभागात आपण किती उपयुक्त आहोत हे दाखवून दिलं.
Web Title: ICC World Cup 2019: Believe it or not; it is a 'self-written' defeat of Team India against New zealand
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.