लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने रविवारी विश्वचषकाला गवसणी घातली. यावेळी इंग्लंडच्या विजयाचा नायक ठरला तो बेन स्टोक्स. अंतिम सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत स्टोक्सने विजयात निर्णायक भूमिका बजावली. पण विश्वचषक जिंकल्यावर स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली. पण माफी मागावी, अशी कोणती गोष्ट स्टोक्सने केली होती...
क्रिकेटच्या पंढरीत, लॉर्ड्सवर झालेला वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना अविस्मरणीय झाला. इंग्लंड आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ पहिलावहिला वर्ल्ड कप उंचावण्यासाठी सज्ज होते आणि दोन्ही संघांनी तोडीततोड खेळ केला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा ( आयसीसी) एक नियम आणि न्यूझीलंडच्या हातून निसटलेला सामना...
इंग्लंडला अखेरच्या तीन चेंडूंत 9 धावांची गरज होती. बोल्टने टाकलेला फुलटॉस चेंडू बोल्टनं डीप मिड विकेटच्या दिशेनं टोलावला. पण, मार्टिन गुप्तीलनं तो चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेनं फेकला आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या स्टोक्सच्या बॅटीला लागून चेंडू सीमारेषेबाहेर गेला. कुमार धर्मसेनानं सहकारी पंचांशी चर्चा करून इंग्लंडला सहा धावा देण्यात आल्या. त्यानंतर हे समीकरण 2 चेंडूंत 3 धावा असे झाले आणि इंग्लंडने सामना बरोबरीत सोडवला.
नियम काय सांगतो?आयसीसीच्या नियम 19.8 नुसार इंग्लंडला देण्यात आलेल्या सहा धावा या चुकीच्या ठरतात. त्यांना पाच धावा मिळायला हव्या होत्या. ओव्हर थ्रोमुळे किंवा क्षेत्ररक्षकाच्या चुकीच्या कृतीमुळे चेंडू सीमारेषेबाहेर गेल्यास धावून घेतलेल्या धावा आणि चार अशा मिळून धावा दिल्या जातात. पण, थ्रो होण्यापूर्वी फलंदाजांनी खेळपट्टीचा मध्यभाग तरी पार करायला हवा. या नियमामुळेच थोडासा संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा गुप्तीलने थ्रो केला त्यावेली स्टोक्स व आदिल रशीद यांनी खेळपट्टीचा मध्यभागही ओलांडलेला नव्हता. त्यावरून हे स्पष्ट दिसते की इंग्लंडला पाचच धावा मिळायला हव्या होत्या. तसे झाले असते तर न्यूझीलंडने एका धावेने जेतेपद पटकावले असते. मग सुपर ओव्हर घेण्याचीही गरज भासली नसती.
या साऱ्या प्रकारानंतर स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केनची माफी मागिती आहे. त्याचबरोबर मी तुझी आयुष्टभर माफी मागेन, असेही स्टोक्स यावेळी म्हणाला आहे.