लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान संघाचा वन डे सामन्यातील निराशाजनक कामगिरीचे सत्र वर्ल्ड कपमध्येही पाहायला मिळत आहे. पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्याच सामन्यात लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. वेस्ट इंडिजने त्यांच्यावर 7 विकेट व 218 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 105 धावांत गुंडाळून विंडीजने हे लक्ष्य 13.4 षटकांत सहज पार केले. ख्रिस गेलने खणखणीत अर्धशतक झळकावले. या पराभवानंतर पाक संघावर चहुबाजूने टीका होत आहे. पाकिस्तानचे माजी खेळाडूही खेळाडूंच्या कामगिरीवर प्रचंड नाराज आहेत. पण, विंडीजविरुद्धचा हा पराभव पाकिस्तानसाठी शुभसंकेत ठरू शकतो. 27 वर्षांपूर्वी पाकिस्तान संघाविरुद्ध असंच काही घडलं होतं, चला जाणून घेऊया.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली. 218 चेंडू राखून विंडीजने मिळवलेला हा वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
पाकिस्तानचा हा सलग 11वा वन डे पराभव आहे. यापैकी चार पराभव हे इंग्लंडकडून, तर पाच ऑस्ट्रेलियाकडून पत्करावे लागले. वर्ल्ड कपच्या मुख्य फेरीत खेळण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेनेही त्यांना पराभूत केले होते. वन डे क्रिकेटमधील पाकिस्तानचा ही पराभवाची सर्वात मोठी मालिका ठरली आहे. यापूर्वी ऑक्टोबर 1987 ते मार्च 1988 या कालावधीत पाकिस्तानने सलग 10 वन डे सामने गमावले होते.
पण, या पराभवाकडे पाकिस्तानी खेळाडू सकारात्मक दृष्टीनं पाहत आहेत. ''2017च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत संघाला पहिला सामना गमवावा लागला होता आणि त्यानंतर आम्ही फिनिक्स भरारी घेतली. त्याच सकारात्मक मानसिकतेतून आताही वाटचाल करण्याची गरज आहे,'' असे गोलंदाज मोहम्मद आमीर म्हणाला. विंडीजच्या तीनही फलंदाजांना त्याने माघारी पाठवले.
1992च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात विंडीजकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर जे घडले ते सर्वांना माहितच आहे. इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रमक केला होता. इम्रान खानचा यशाचा तोच कित्ता गिरवण्याचे स्वप्न पाहत आहेत.
Web Title: ICC World Cup 2019: Can pakistan repeat 1992 world cup magic after defeated by west indies in first match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.