आता कुठे वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे, असे जाणवू लागले आहे. शुक्रवारी यजमान इंग्लंडला दुबळ्या श्रीलंकेने अनपेक्षितपणे पराभवाची चव चाखवली, तर शुक्रवारी जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांना विजयासाठी अनुक्रमे अफगाणिस्तान व वेस्ट इंडिजनं चांगलाच घाम गाळायला भाग पाडले. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील खरा थरार आता सुरू झाला आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा एकतर्फीच रंगला, पण मध्यंतरानंतर जसा चित्रपट अधिक रंजक होत जातो, तशीच उत्सुकता आता वर्ल्ड कप स्पर्धेतही निर्माण होऊ लागली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना भारतीय वेळेत असल्याने तो सर्वांना पाहता आला. पण, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हा सामना डे-नाईट होता आणि तो मध्यरात्री संपला. त्यामुळे या सामन्यातील थरार फार कमी लोकांनी अनुभवला.
याच सामन्यात खरी चुरस पाहायला मिळाली. वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील आव्हान टीकवण्याच्या दृष्टीनं विंडीजसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा होता. न्यूझीलंडला पहिल्याच षटकात दोन धक्के देत त्यांनी त्या दिशेनं पाऊलही टाकलं, परंतु केन विलियम्सन आणि रॉस टेलर ही अनुभवी जोडी मैदानावर चिकटली आणि 160 धावांची भागीदारी करून किवींना पुन्हा ट्रॅकवर आणले. त्यानंतर विलियम्सनने अन्य खेळाडूंना सोबत घेत संघाला 291 ही समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. विलियम्सनच्या 148 आणि टेलरच्या 69 धावांच्या जोरावर किवींनी 8 बाद 291 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचे 2 फलंदाज 20 धावांवर माघारी परतले. ख्रिस गेल ( 87) आणि शिमरोन हेटमायर ( 54) यांनी योगदान दिले, परंतु किवींनी धक्का सत्र सुरू केले. विंडीजचे 7 फलंदाज 164 धावांत माघारी परतले होते अन् किवींचा विजय जवळपास निश्चितच झाला होता..
पण, जरा थांबा... खरा थरार तर इथूनच सुरू झाला. कार्लोल ब्रॅथवेट नावाचे वादळ मैदानावर होते. त्याच्या तडाख्यानं किवींना हादरवून टाकलं. हाच तो ब्रॅथवेट ज्यानं 2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या बेन स्टोक्सची केलेली धुलाई आठवते. त्या सामन्यात अंतिम षटकात विजयासाठी 19 धावांची गरज असताना ब्रॅथवेटनं सलग चार खणखणीत षटकार खेचून विंडीजला वर्ल्ड कप जिंकून दिला होता. किवींविरुद्धची आजची खेळीही तशीच होती, परंतु त्याचा शेवट गोड होऊ शकला नाही.
सहा फुटाहून अधिक उंच... बाहुबलीसारखी ताकद... चेंडूवर प्रहार केला की तो सीमारेषेपार सहज जाईल, असा त्याचा फटका... ब्रॅथवेट नावाचं हे वादळ मँचेस्टरमध्ये घोंगावलं... त्याच्या तडाख्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पालापाचोळा होईल, असेच वाटत होते. अखेरच्या 13 षटकातं तळाच्या तीन फलंदाजांना ( मुळचे गोलंदाज) सोबत घेऊन विजयासाठीच्या 127 धावांचा पाठलाग करण्यासाठी ब्रॅथवेटने खेळपट्टीवर शड्डू ठोकला... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असलेला न्यूझीलंड संघ त्याच्या फटकेबाजीसमोर हतबल झाला होता. पाहतापाहता ब्रॅथवेटनं चेंडू व धावांच अंतर कमी केलं. केमार रोच, शेल्डन कोट्रेल आणि ओशाने थॉमस या गोलंदाजांसह ब्रॅथवेटनं विंडीजच्या विजयासाठी खिंड लढवली. थॉमससोबतच्या 41 धावांच्या भागीदारीत ब्रॅथवेटनेच सर्व धावा केल्या आणि त्याही केवळ 20 चेंडूंत..
अखेरच्या 18 चेंडूंत 33 धावांची गरज असताना ब्रॅथवेटनं 48व्या षटकात 25 धावा चोपल्या आणि सामना 12 चेंडूंत 8 धावा असा विंडीजच्या बाजूनं झुकवला. चौकार- षटकारांची आतषबाजी करताना ब्रॅथवेटनं स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याची काळजी घेतली होती. ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन हे हुकुमी एक्के अपयशी ठरल्यानंतर किवींचा कर्णधार केन विलियम्सनने चेंडू जेम्स निशॅमच्या हाती सोपवला. 49व्या षटकात पहिले तीन चेंडू निर्धाव राहिल्यानंतर चौथ्या चेंडूवर ब्रॅथवेटनं दोन धावा काढल्या. पाचवा चेंडू पुन्हा निर्धाव... आता सामना विंडीजच जिंकणार हा विश्वासानं कॅरेबियन जल्लोष सुरू होता, तर किवींचे चाहते डोक्यावर हात ठेवून डोळे पाणावून चमत्काराची वाट पाहत होते. ब्रॅथवेटनं 49व्या षटकाचा अखेरच्या चेंडूवर जोरदार प्रहार केला अन् चेंडू सीमारेषेपार जाईल असेच वाटत होते. पण, घडले विपरित ट्रेंट बोल्टनं सीमारेषेनजीक अगदी अचुकतेन झेल टिपला अन् किवींच्या खेळाडूंसह चाहत्यांनी सुटकेचा निश्वास टाकला... ब्रॅथवेटनं 82 चेंडूंत 9 चौकार व 5 षटकार खेचून 101 धावा केल्या. वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतक त्यानं संस्मरणीय केलं.
वादळासारखा भिरभिरणारा ब्रॅथवेट खेळपट्टीवर गुडघ्यावर बसला होता... आपण हरलो यावर त्यालाही विश्वास बसत नव्हता... डोळे दाटून आलेले, परंतु खिलाडूवृत्तीनं तो याही प्रसंगाला सामोरे गेला... तो लढता, संघाच्या विजयासाठी त्यानं सर्वतोपरी प्रयत्न केले, पण अखेरीस नशीबानं त्याच्याकडे पाठ फिरवली, असंच म्हणावं लागेल. ब्रॅथवेटच्या या खेळीनं विंडीजला विजय मिळवून दिला नसला तरी सहकारी आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मनात मानाचे स्थान नक्की पटकावलं. किवींचा कर्णधार विलियम्सननेही ब्रॅथवेटच्या खेळीचं कौतुक केलं. विलियम्सनलाही ब्रॅथवेटचं दुःख कळलं. एक सच्चा खेळाडूच ते समजू शकतो आणि म्हणून विजयाचा जल्लोष करण्यापूर्वी त्यानं हताश झालेल्या ब्रॅथवेटच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि हा क्षण पुढील अनेक वर्ष तरी दर्दी चाहते विसणार नाहीत.
पाहा व्हिडीओ
2016च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमधील ब्रॅथवेटचं वादळ, Video
Web Title: ICC World Cup 2019 : Carlos Brathwaite stunning innings against new zealand won hearts of many
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.