लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशने पाकिस्तानचा मार्ग अडवल्याने उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत. यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड हे चार संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत राहिले आहेत. पण उपांत्य फेरीत कोण कोणाशी भिडेल याचे चित्र शनिवारी स्पष्ट होईल. सद्य परिस्थितीनुसार भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असेल असे दिसत असले तरी यात उलटफेर होऊ शकतो.
शनिवारी साखळी फेरीचे सर्व सामने संपतील. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. त्यापाठोपाठ भारतीय संघ असेल. भारताला अखेरच्या लढतीत श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि ही लढत जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल. पण, तशी शक्यता फार कमीच आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडने आपले स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.