मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिज संघाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जगातील सर्वाधिक स्फोटक फलंदाजाची फौज विंडीज संघात आहे. त्यात एक नाव आघाडीवर आहे आणि ते म्हणजे ख्रिस गेलचे... वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत गेलने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना राष्ट्रीय संघात दमदार पुनरागमन केले होते. त्याचा हाच फॉर्म वर्ल्ड कपमध्येही पाहण्यासाठी कॅरेबियन उत्सुक आहेत. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत गेलच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. गेलची ही पाचवी वर्ल्ड कप स्पर्धा आहे आणि कदाचित अखेरच्या वर्ल्ड कप स्पर्धेत गेल जेतेपदाचा चषक उंचावण्यासाठी आतुर आहे.
गेलने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2019 नंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हणू शकतो. 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वात अनुभवी खेळाडूंमध्ये गेलचा समावेश आहे. त्याने 2003, 2007, 20111 आणि 2015 साली वर्ल्ड कप स्पर्धेत विंडीज संघाचे प्रतिनिधित्व केले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये विंडीज संघाला जेतेपद पटकावता न आल्यास गेलच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवला जाऊ शकतो. पाच वर्ल्ड कप स्पर्धा खेळूनही जेतेपदाचा चषक न उंचावणाऱ्या खेळाडूंमध्ये गेलचा समावेश होऊ शकतो.
पाच वर्ल्ड कप खेळूनही जेतेपद न पटकावू शकलेले खेळाडू - स्टीव्ह टिकोलो ( केनिया), थॉमस ओडोयो ( केनिया), ब्रायन लारा ( वेस्ट इंडिज), शिवनरीन चंद्रपॉल ( वेस्ट इंडिज), महेला जयवर्धने ( श्रीलंका ), जॅक कॅलिस ( दक्षिण आफ्रिका), डॅनिएल व्हिटोरी ( न्यूझीलंड), शाहिद आफ्रिदी ( पाकिस्तान).
महान फलंदाज सचिन तेंडुलकरलाही पाच प्रयत्नांत वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता, परंतु 2011मध्ये त्याने वर्ल्ड कप उंचावला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला.
Web Title: ICC World Cup 2019: Chris Gayle on verge of bagging unwanted record as he gears up for his final World Cup appearance
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.