- अयाझ मेमन (कन्सल्टिंग एडिटर, लोकमत)
जॉनी बेयरस्टो आणि कर्णधार यांच्यातील विरोधाभास सामन्यापूर्वी विस्मयचकित करणारा आहे. इंग्लंडच्या ड्रेसिंगरूममध्ये एक वादळ आले आहे. त्यामुळे त्यांची उपांत्य फेरीची वाटचाल खडतर होऊ शकते. इंग्लंडचा संघ कागदावर ताकदवान आहे. मात्र, बेयरस्टोमुळे काहीशी शंका उपस्थित होते. या स्पर्धेत काय चुकीचे झाले हे देखील उघड झाले आहे. २०१५च्या विश्वचषकातील कामगिरीनंतर त्यांनी आता जास्त चांगला खेळ केला आहे. त्यांचा आक्रमक दृष्टिकोन, फलंदाजी आणि त्यासाठी मदत करणाऱ्या खेळपट्ट्या हे पाहणे रोमांचक आहे, पण कदाचित त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यावर खेळणे कठीण होत आहे. मी येथे आॅस्ट्रेलियाचा संदर्भ देत नाही. त्यांच्याविरोधात इंग्लंडला खेळपट्टीचा चुकीचा अंदाज घेतल्याची मोठी किंमत मोजावी लागली.१९८३ मध्ये खेळणारा इंग्लंडचा संघ कसा होता, हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ते नक्कीच आठवत असेल. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या उपांत्यसामन्याची शास्त्रींना आठवण असेल. त्यावेळी भारत विजयाचा दावेदार मानला जात होता. तेव्हा भारताच्या फिरकीसाठी इंग्लंड तयार असेल, असे भारताला अपेक्षित नव्हते. त्यांना स्थानिक खेळाडू सरावासाठी मिळाले. शास्त्री यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला त्यावेळी गुच आणि कंपनीने स्विप शॉटचा वापर मोठ्या खुबीने केला होता आणि भारताला पराभूत व्हावे लागले होते. या इतिहासाची उजळणी करण्याचे कारण असे की, अतिआत्मविश्वास हा कोणत्याही संघाला महागात पडू शकतो.