ब्रिस्टॉल, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाचवेळचा जग्गजेता ऑस्ट्रेलिया विश्वचषक स्पर्धेतील आपल्या मोहिमेची सुरुवात शनिवारी अफगाणिस्तानविरुदध करणार आहे. या सामन्यात सर्वांचे लक्ष स्टिव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या कामगिरीकडे असणार आहे. दुखापतीमुळे वॉर्नरच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, परंतु तो या लढतीसाठी तंदुरुस्त असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केले. वॉर्नरच्या खेळण्याने मात्र फलंदाजांच्या क्रमवारीचा पेच निर्माण झाला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या संघाचा कर्णधार अॅरोन फिंचने ही घोषणा केली. वॉर्नरने तंदुरूस्ती चाचणी परीक्षा पास केली आहे. त्यामुळे 2015च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाची सलामीची जोडी पुन्हा धडाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. पण, फिंचने फलंदाजीच्या क्रमवारीबाबत सस्पेंस ठेवला आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श यांच्यात चढाओढ आहे.
ऑस्ट्रेलियाकडे पॅट कमिन्स व मिशेल स्टार्क या वेगवान गोलंदाजांसह जेसन बेहरेनडोर्फ , नाथन कूल्टर नाईल व केन रिचर्डसन असतील. अॅडम झम्पा व नॅथन लियोन यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाकडे फिरकीला चांगले पर्याय आहेत. सराव सामन्यात त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.