लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : महान फलंदाज सचिन तेंडुलकरने वर्ल्ड कप स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात समालोचकाच्या भूमिकेत पदार्पण केले. समालोचन करताना तेंडुलकरने वर्ल्ड कप स्पर्धेतील तीन गेम चेंजर खेळाडूंची नावं सांगितली. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर यांचा बोलबाला राहील, असे तेंडुलकर म्हणाला.
रशीदविषयी तो म्हणाला,''या स्पर्धेत रशीद हा गेम चेंजर ठरेल. पण त्याला एक सल्ला देऊ इच्छितो, त्याने 50 षटकांच्या सामन्याचा कसोटी सामन्याप्रमाणे विचार करावा. प्रतिस्पर्धी फलंदाजांना त्यानं आव्हान देत रहावं. आक्रमक फिल्डींग लावून फलंदाजांना मिड ऑन व मिड ऑफ वरून खेळण्यास भाग पाडावे.''
वॉर्नरची आयपीएलमधील दमदार कामगिरीची पुनरावृत्ती वर्ल्ड कपमध्येही पाहायला मिळेल, असा विश्वास तेंडुलकरने व्यक्त केला. तो म्हणाला,'' आयपीएलमध्ये वॉर्नरचा खेळ मी पाहिला. तो धावांसाठी भूकेला दिसला. त्याच्या खेळात एकाग्रता जाणवली. तो दृढ निश्चयाने वर्ल्ड कप स्पर्धेत दाखल झाला आहे.''
कठीण परिस्थितीत विविध प्रकारचे चेंडू टाकण्याची क्षमता असलेल्या आर्चरने तेंडुलकरला प्रभावित केले आहे. आर्चरने पहिल्याच सामन्यात तीन विकेट घेत आफ्रिकेला मोठा धक्का दिला आणि इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.'' कठीण प्रसंगी इंग्लंडचा संघ आर्चरला गोलंदाजीसाठी पाचारण करतील. एखादी भागीदारी तोडायची असल्यास आर्चर महत्त्वाचा गोलंदाज ठरू शकतो,'' असे तेंडुलकरने सांगितले.
Web Title: ICC World Cup 2019 : David Warner, Jofra Archer and Rashid Khan will be a game changer in WC, Say Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.