ट्रेंट ब्रिज, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : एकेकाळी ऑस्ट्रेलियाची बिनबाद 146 अशी भक्कम स्थिती होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा संघ साडे तिनशे धावांचा पल्ला सहज गाठेल, असे म्हटले जात होते. पण शतकवीर डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना 307 धावांवर समाधान मानावे लागले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने पाच बळी मिळवत ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडले.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच आणि वॉर्नर यांनी दमदार फलंदाजी करत 146 धावांची सलामी दिली. फिंच 82 धावांवर आऊट झाला, पण त्यानंतर वॉर्नरने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत शतक झळकावले. वॉर्नरने 11 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 107 धावांची खेळी साकारली. वॉर्नरबाद झाला तेव्हा 37.5 षटकांत ऑस्ट्रेलियाची 4 बाद 242 अशी धावसंख्या होती. पण त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला आणि त्यांना साडे तिनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही.