लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : बांगलादेशच्या गोलंदाजीचे डेव्हिड वॉर्नरने पिसे काढल्याचेच आज पाहायला मिळाले. वॉर्नरच्या वादळापुढे बांगलादेशचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला या सामन्यात 381 धावांचा डोंगर उभारता आला.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या पथ्यावर पडला. वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी सुरुवातीपासून दमदार फलंदाजीचा नमुना पेश करत १२१ धावांची सलामी दिली. त्यानंतर फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. फिंचने ५१ चेंडूंत ५ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावा केल्या.
फिंच असताना आणि बाद झाल्यावरही वॉर्नरच्या फलंदाजीमध्ये कसलाच फरक जाणवला नाही. बांगलादेशच्या गोलंदाजांवर वॉर्नर कायम तुटून पडत होता. वॉर्नरने यावेळी यंदाच्या विश्वचषकातील दुसरे शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यावर वॉर्नरने बांगलादेशच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घायायला भाग पाडले. वॉर्नरने या सामन्यात फटक्यांचा धडाकाच लावला होता. वॉर्नरने १४७ चेंडूंत १४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर १६६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
वॉर्नरला यावेळी उस्मान ख्वाजानेही चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १९२ धावांची भागीदारी रचली. ख्वाजाने या सामन्यात ७२ चेंडूंत १० चौकारांसह ८९ धावा केल्या.
वॉर्नर बाद झाल्यावर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी फटकेबाजीचा नमुना पेश केला. मॅक्सवेलने फक्त १० चेंडूंत २ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ३२ धावांची खेळी साकारली होती. बांगलादेशकडून सौम्य सरकारने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडले.