चेस्टर-ले-स्ट्रीट, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडला पराभवाचा धक्का दिल्यानंतर वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या श्रीलंकेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी त्यांना उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. पण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शुक्रवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात श्रीलंकेला साजेशी सुरूवात करता आली नाही. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून लंकेला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कागिसो रबाडाने डावाच्या पहिल्याच चेंडूवर लंकेला धक्का दिला. त्याने सलामीवीर व कर्णधार दिमुथ करुणारत्ने ( 0) याला फॅफ ड्यू प्लेसिसकरवी झेलबाद केले. करुणारत्ने शून्यावर बाद होऊनही एक पराक्रम करून गेला.
रबाडाने टाकलेल्या चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधण्यात अपयशी ठरलेल्या करुणारत्नेने पहिल्याच चेंडूवर विकेट टाकली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्याच चेंडूवर बाद होणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे. शिवाय गोल्डन डक नावावर करणारा पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. यापूर्वी आशियातील एकाही कर्णधारावर अशी नामुष्की ओढावलेली नाही.