लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात आज श्रीलंकेचा सामना करणार आहे. या स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारेल, अशा चर्चा सुरू आहेत. अनेकांच्या मते ही धोनीची अखेरची स्पर्धा असेल. धोनीच्या फॉर्म सध्या चिंतेचा विषय आहे आणि त्यामुळेच त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्यास कोणाला आश्चर्यही वाटणार नाही. पण, धोनीनेच त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली आहे. ABP News चॅनेलला धोनीनं त्याच्या निवृत्तीबद्दल सांगितले आहे.
तो म्हणाला,''मी कधी निवृत्त होईन, याची मलाही कल्पना नाही. पण, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी मी निवृत्त व्हावे, अशी अनेकांची इच्छा आहे.'' त्याने या विधानातून संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे. धोनीनं निवृत्त व्हावे अशीच त्यांची इच्छा असल्याचे, अप्रत्यक्षितरित्या धोनीला सुचवायचे आहे. त्यामुळे आता धोनी विरुद्ध व्यवस्थापक असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत धोनीचा अनुभव भारतीय संघाच्या कामी येत असला तरी त्याला फलंदाजीमध्ये अपेक्षित चमक दाखवता आलेली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत केलेली अर्धशतकी खेळी ही त्याची या स्पर्धेतील एकमेव मोठी खेळी ठरली आहे. तसेच शेवटच्या षटकांमध्ये वेगाने धावा जमवण्यात धोनी अपयशी ठरत असल्याने माजी क्रिकेटपटूंसह क्रिकेटप्रेमींकडूनही त्याच्या बचावात्मक खेळावर टीका होत आहे. त्यामुळे, सातत्याने होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठा निर्णय घेतला असून, या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचे वृत्त पीटीआयने काही दिवसांपूर्वी दिले होते.
सचिन तेंडुलकरकडून बचाव भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर माहीच्या मदतीला धावला आहे. , बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर तेंडुलकर म्हणाला,''मला वाटतं ती महत्त्वाची खेळी होती आणि संघाला जशा खेळीची गरज होती, धोनी तसाच खेळला. तो 50 षटकं खेळपट्टीवर टिकून राहिला, तर इतर फलंदाजांवरील दडपण कमी होतं. त्याच्याकडून हेच अपेक्षित आहे आणि तो तेच करतोय. त्याच्यासाठी संघ महत्त्वाचा आहे.''