लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका : यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या सामन्याने वर्ल्ड कप स्पर्धेच्या 12व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. या सामन्यात आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमलाला इतिहास घडवण्याची संधी आहे. अमलाला वन डे क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 90 धावांची गरज आहे. अशी कामगिरी करणारा तो आफ्रिकेचा चौथा फलंदाज ठरू शकतो. याआधी जॅक कॅलिस ( 11550), एबी डिव्हिलियर्स ( 9427) आणि हर्शल गिब्स ( 8094) यांनी हा पल्ला गाठला आहे.
पण, या विक्रमासह अमलाला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात अमलाने 8000 धावांचा पल्ला पार केल्यास कोहलीच्या नावावरील विक्रम मोडू शकतो. वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 8000 धावांचा विक्रम अमलाच्या नावावर नोंदवला जाईल. कोहलीनं 175 डावांत हा पल्ला गाठला आहे, तर अमलाने 171 डावांत 7910 धावा केल्या आहेत. अमलाने इंग्लंडविरुद्ध 90 धावा केल्यास सर्वात जलद ( 172 डाव) 8000 धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होईल. अमलाच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000, 4000, 5000, 6000 आणि 7000 धावा करण्याचा विक्रम आहे. त्याने 174 वन डे सामन्यांत 49.74च्या सरासरीनं 7910 धावा केल्या आहेत. त्यात 27 शतकं व 37 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय
इंग्लंडविरुद्ध 1000 धावा पूर्ण करण्यासाठी अमलाला 37 धावांची आवश्यकता आहे. जॅक कॅलिस ( 1054) नंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा आफ्रिकन खेळाडू, तर एकूण 22 वा खेळाडू ठरणार आहे. पण, अमलाचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला हा विक्रम करणे सोपं नसेल. त्याने 2018 नंतर आतापर्यंत 25 टक्के सामन्यांतच 50 धावांचा आकडा पार केला आहे.