लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडनं बुधवारी न्यूझीलंडवर मिळवलेला विजय हा पाकिस्तान संघासाठी मोठा धक्काच होता. इंग्लंडने या विजयासह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आणि न्यूझीलंड सरस नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानासह अंतिम चौघांत प्रवेश करेल, हेही निश्चित आहे. त्यामुळे पाकिस्तानला अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवूनही उपयोग होणार नाही. त्यांचे स्पर्धेतील आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यात जमा आहे. इंग्लंडचा हा विजय पाकिस्तानसह विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासाठीही धक्का देणारा ठरला आहे... जाणून घ्या कसे...
यजमान इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. विजयानंतर इंग्लंडने जवळपास 27 वर्षांनी एक इतिहास रचला आहे. इंग्लंडने 1992 साली वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. जॉनी बेअरस्टो ( 106) आणि जेसन रॉय ( 60) यांच्या दमदार सलामीनंतर कर्णधार इयॉन मॉर्गनच्या ( 42) उपयुक्त खेळीच्या जोरावर इंग्लंडने 8 बाद 305 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संपूर्ण संघ 186 धावांत तंबूत परतला. मार्क वूडने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आले होते.शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले होते. इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली होती आणि 123 गुणांसह भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला होता. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. पण, आता न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाने इंग्लंडला पुन्हा अव्वल स्थान मिळवून दिला आहे. इंग्लंड 123 गुणांसह अव्वल स्थान काबीज केले आहे, तर भारताला एक गुणाचा तोटा सहन करावा लागला आहे.
विजय इंग्लंडचा, पण बँड वाजला पाकिस्तानचान्यूझीलंडविरुद्धच्या सा़मन्यात इंग्लंडने विजय मिळवत उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. पण इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तानचा चांगलाच बँड वाजल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण आता पाकिस्तानच्या संघाचे विश्वचषकातील आव्हान जवळपास संपुष्टात आले असल्याचे म्हटले जात आहे. हा सामना जर न्यूझीलंडने जिंकला असता आणि पाकिस्तान पराभूत झाला असता तर पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकला असता. कारण या सामन्यापूर्वी इंग्लंडचे 10 गुण होते. त्यामुळे इंग्लंड पराभूत झाला असता तर त्यांचे 10 गुणच राहिले असते. त्यानंतर जर पाकिस्तानने बांगलादेशवर विजय मिळवला असता तर त्यांना 11 गुणांसह उपांत्य फेरी गाठता आली असती. पण आता इंग्लंडच्या विजयाने पाकिस्तानचे उपांत्य फेरी गाठण्याचे स्वप्न बेचिराख होण्याच्या मार्गावर आहे.