Join us  

वर्ल्ड कप परीक्षेत व्हायचं असेल पास, तर विराटसेनेला करावा लागेल 'या' सगळ्यात कठीण पेपरचा अभ्यास!

ICC World Cup 2019 : 12 वी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून बरोबर दहाव्या दिवशी सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 3:02 PM

Open in App

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : 12 वी वन डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा आजपासून बरोबर दहाव्या दिवशी सुरू होणार आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणारा हा पाचवा वर्ल्ड कप आहे. जगातील अव्वल दहा संघ जेतेपदासाठी एकमेकांना भिडणार आणि 14 जुलैला जेतेपदाचा चषक कोणाच्या हाती असेल हे स्पष्ट होणार. सध्यातरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाच्या दावेदारात आघाडीवर आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच्या Exit Pollमध्ये तरी सध्या भारताचीच हवा आहे, परंतु भ्रमाचा हा फुगा कधीही फुटू शकतो. 

यंदाचा वर्ल्ड कप हा भारताचाच आहे, कोहलीला इंग्लंडमध्ये जाऊन केवळ वर्ल्ड कप घेऊन यायचा आहे... अशा रंगवलेल्या स्वप्नांना यजमान इंग्लंड सुरूंग लावू शकतो. जेतेपदाच्या दावेदारात यजमान इंग्लंडकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक तर इंग्लंड त्यांच्या घरच्या प्रेक्षकांसमोर, परीचित वातावरणात व खेळपट्टीवर खेळणार आहे, त्यामुळे जेतेपदाच्या दावेदारांमध्ये इंग्लंडही आहेच. त्यात वर्ल्ड कप पूर्वीच्या पाकविरुद्धच्या मालिकेत त्यांनी केलेली कामगिरी ही अन्य प्रतिस्पर्धींच्या मनात धडकी नक्की भरवणारी आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात पावसाने दमदार बॅटिंग केली, परंतु त्यानंतरच्या चारही सामन्यांत इंग्लंडच्या फलंदाजांची आतषबाजी पाहायला मिळाली.

इंग्लंडने चारही वन डे सामन्यांत 340 हून अधिक धावा केल्या. सलग चार वन डे सामन्यांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच संघ ठरला. विशेष म्हणजे इंग्लंडने हे चारही सामने अगदी सहज जिंकून मालिका 4-0 अशी खिशात घातली. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर इंग्लंडच्या खेळाडूंची कामगिरी सरस झाली आहे. प्रतिस्पर्धी गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांनी सळो की पळो करून सोडले. जॉनी बेअरस्टो, जो रूट, इयॉन मॉर्गन, जेसन रॉय, जोस बटलर यांच्या बॅटीतून वाहणारा धावांचा पूर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स आणि मोईन अली यांची अष्टपैलू कामगिरी आणि टॉम कुरण, मार्क वूड यांची सुरेख गोलंदाजी... या गोष्टी इंग्लंडच्या संघाला परिपूर्ण बनवतात. त्यामुळे त्यांना हलक्यात घेणे, कोणत्याही संघाला महागात पडू शकते.  

आता जरा आकड्यांवर नजर टाकूया... 

  • 1 जानेवारी 2018 पासून ते 20 मे 2019 पर्यंतच्या संघांच्या कामगिरीची तुलना केल्यास इंग्लंडचे पारडे जड आहे. इंग्लंडने सलग 11 वने डे मालिकांमध्ये एकही पराभव पत्करलेला नाही आणि घरच्या मैदानावर त्यांचा हा सलग 8 वन डे  मालिका विजय आहे.  
  • 1 जानेवारी 2018 पासून ते आतापर्यंत इंग्लंडने सर्वाधिक 14 वेळा 300 हून अधिक धावा केल्या आहेत. त्यानंतर पाकिस्तान ( 8) आणि वेस्ट इंडिज ( 7) यांचा क्रमांक येतो.  या क्रमवारीत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड ( प्रत्येकी 6) चौथ्या स्थानी आहेत. 
  • याच कालावधीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांमध्येही इंग्लंडने आघाडी घेतली आहे. त्यांनी 24 वन डे सामने जिंकून भारताचा 22 विजयाचा विक्रम मोडला आहे. दक्षिण आफ्रिका/ बांगलादेश 17, न्यूझीलंड /अफगाणिस्तान 15, वेस्ट इंडिज 12, ऑस्ट्रेलिया/ आयर्लंड 11, पाकिस्तान 10 हेही बरेच पिछाडीवर आहेत.
  • इंग्लंडच्या सलामीवीरांनी आतापर्यंत 7 शतकी भागीदारी केल्या. या विक्रमातही भारत ( 4), वेस्ट इंडिज ( 1), अफगाणिस्तान (1) पिछाडीवर आहेत.
  • इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यातील चार सामन्यांत एकूण 2780 धावा झाल्या. 
  • इंग्लंडला अद्याप एकदाही वर्ल्ड कप उंचावता आलेला नाही. त्यांना तीनवेळा ( 1979, 1987, 1992) उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. 

इंग्लंड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, मोईन अली, ख्रिस वोक्स, लिएम प्लंकेट, आदील रशीद, मार्क वूड, अ‍ॅलेक्स हेल्स. टॉम कुरन, जो डेन्ली, डेव्हिड विली. 

टॅग्स :वर्ल्ड कप २०१९इंग्लंडविराट कोहली