मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेत आज ऑस्ट्रेलिया आणि यजमान इंग्लंड या कट्टर संघांमध्ये सामना रंगणार आहे. ऑस्ट्रेलियापेक्षा यजमान इंग्लंडसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. दुबळ्या श्रीलंकेकडून पत्करावा लागलेल्या अनपेक्षित पराभवानंतर इंग्लंडला उपांत्य फेरीतील आव्हान टीकवण्यासाठी आता संघर्ष करावा लागणार आहे. त्या संघर्षाची पहिली परीक्षा आज आहे. ऑस्ट्रेलियाने 10 गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले आहे. त्यामुळे इंग्लंडसाठी उर्वरित तीन सामन्यांमधील प्रत्येक निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या सामन्यात इंग्लंडने जिंकावे अशी यजमानांच्या पाठीराख्यांची भावना असली तरी त्यांच्या पराभवासाठी तीन संघ देव पाण्यात ठेवून आहेत... का, चला जाणून घेऊया...
वर्ल्ड कप स्पर्धेतील गुणतालिकेचा विचार केल्यास सध्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सेफमध्ये दिसत आहेत. न्यूझीलंड 11 गुणांसह अव्वल क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 10 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडला उर्वरित तीन सामन्यांत ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि इंग्लंडचा सामना करायचा आहे. हे तीनही सामने गमावल्यास किवींचा संघ टॉप फोरमध्ये कायम राहू शकतो. त्यामुळे त्यांच्यासाठी फार चिंता करण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न ऑस्ट्रेलियाचा... उर्वरीत तीन सामन्यांत त्यांच्यासमोर इंग्लंड ( जो सामना आज आहे), न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांचे आव्हान आहे. यापैकी एक विजय ऑसींसाठी पुरेसा आहे.
पाच सामन्यांत चार विजय व एक अनिर्णीत निकालासह भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्या खात्यात 9 गुण आहेत. उर्वरित लढतीत त्यांच्यासमोर वेस्ट इंडिज, बांगलादेश, इंग्लंड व श्रीलंका यांचे आव्हान आहे. जेवढे सामने अधिक तेवढ्या संधी अधिक. त्यामुळे भारतीय संघासाठी चिंतेचे कारण नाही. इंग्लंड मात्र अडचणीत सापडला आहे. त्यांच्या खात्यात 6 सामन्यांत 8 गुण आहेत आणि त्यांना उर्वरित तीन लढतीत एक विजय पुरेसा आहे. पण, हे आव्हान सोपं नाही, कारण त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, भारत व न्यूझीलंड हे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. इंग्लंडच्या प्रत्येक निकालावर उपांत्य फेरीच्या शर्यतीत असलेल्या अन्य तीन संघांचे भवितव्यही अवलंबून आहे. बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे तीन आशियाई संघ सध्यातरी उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहेत. बांगलादेशचे दोन, तर श्रीलंका व पाकिस्तान यांचे प्रत्येकी तीन सामने शिल्लक आहेत.
इंग्लंडने एकतरी विजय मिळवल्यास या तीनही संघांच्या मनसुब्याला धक्का बसू शकतो. समजा इंग्लंड आज जिंकल्यास त्यांचे एकूण गुण 10 होतील आणि ते थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचतील. असे झाल्यास पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश यांचा मार्ग खडतर बनेल. कारण बांगलादेशला उर्वरित दोन सामन्यांत ( भारत व पाकिस्तान) विजय मिळवूनही 11 गुण होतील, पण तसे होण्याची शक्यता फार कमीच आहे. पाकिस्तानलाही ( अफगाणिस्तान, न्यूझीलंड व बांगलादेश) यांच्याविरुद्ध विजय मिळवावा लागेल. पाकने असे केल्यास बांगलादेशचे आव्हान संपुष्टात येईल. श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज व भारत हे तगडे स्पर्धक आहेत. त्यामुळे त्यांनाही तीनही सामने जिंकावे लागतील. असे झाल्यास भारतीय संघाच्याही अडचणी वाढू शकतील. त्यामुळे इंग्लंडचा पराभव हा बांगलादेश, श्रीलंका व पाकिस्तान या संघांसाठी दिलासादायक ठरणारा आहे.