कार्डिफ : सलामीला मोठा विजय नोंदविल्यानंतर पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या यजमान इंग्लंडला विजयी पथावर पोहोचण्याचे आव्हान आहे. शनिवारी बांगलादेशविरुद्ध खेळताना इंग्लंड सावध पवित्र्यात असेल. २०१५ च्या विश्वचषकात बांगलादेशने इंग्लंडला १५ धावांनी नमवले होते. तेव्हापासून इंग्लंडने अनेक बदल केले. इंग्लंडने द. आफ्रिकेला १०४ धावांनी नमविल्यानंतर पाककडून मात्र १४ धावांनी पराभव पचवावा लागला. मागच्या सामन्यात यजमानांना पाकच्या चाहत्यांचा बराच त्रास झाला. बांगलादेशविरुद्धही अशीच स्थिती राहू शकते.
दोन्ही संघांदरम्यान सन २००० पासून आतापर्यंत २० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने झाले असून इंग्लंडने १६, तर बांगलादेशने ४ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील शेवटच्या ५ लढतींपैकी ३ सामने इंग्लंडने, तर दोन सामन्यांमध्ये बांगलादेशने बाजी मारली आहे.दोन्ही संघांदरम्यान विश्वचषकामध्ये आतापर्यंत ३ सामने झाले असून बांगलादेशने दोन, तर इंग्लंडने एका सामन्यात विजय मिळविला आहे.विश्वचषकामध्ये इंग्लंडने बांगलादेशविरुद्ध २६०. तर बांगलादेशने इंग्लंडविरुद्ध २७५ धावा अशी सर्वाेच्च धावसंख्या उभारली आहे.