सचिन कोरडे : सध्या देश-विदेशात क्रिकेट वर्ल्डकपची उत्सुकता आहे. गोव्यात मात्र आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर स्पर्धा सुरू असल्याने गोवा बुद्धिबळमय झाला आहे. अशा स्थितीत क्रिकेटप्रेमी बुद्धिबळपटू असलेल्या मुंबईच्या आदिल मित्तल याने इंग्लंड संघ यंदाचा विश्वचषक जिंकेल, असे भाकीत केले आहे. देशातील सर्वात लहान आंतरराष्ट्रीय मास्टर किताब मिळविणाºया १२ वर्षीय आदिलचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याने ‘लोकमत’शी बोलताना विश्वचॅम्पियन होण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले. ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर दुसरी गोवा आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आदिल सहभागी झाला आहे.
एरोफ्लोट ओपन २०१९ मध्ये आदिलने आयएमचा फायनल नॉर्म मिळविला होता. तेव्हा तो १२ वर्षे ५ महिन्यांचा होता. हा खेळाडू येत्या सहा-सात महिन्यांत भारताचा ग्रॅण्डमास्टर बनेल, असा विश्वास विश्वविजेता विश्वनाथन आनंद यानेही व्यक्त केलेला आहे. राजस्थान येथे एकत्रितपणे २० खेळाडूंसह आनंद खेळला होता त्यात आदिलचाही समावेश आहे. आपल्या खेळीने आदिलने आनंदला जिंकून घेतले होते. त्यानंतर गुजरात येथे एका स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या आदिलसोबत दुर्दैवी घटना घडली होती. देवाच्या दर्शनासाठी गेलेला आदिल निसरड्या पायºयांवरून घसरला होता. त्यात त्याच्या मांडीला जबर दुखापत झाली होती. १३ वर्षांखालील ही स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागणार असे त्याला वाटत होते. मात्र, ताबडतोब उपचार घेत त्याने दुसºया दिवशीची फेरी खेळली आणि दिल्लीच्या आर्यन वर्षिनी याचा पराभव करीत स्पर्धाही जिंकली. आदिल तेव्हापासून व्हिलचेअरवर आहे. व्हिलचेअरवर राहूनही त्याने बुद्धिबळाचा सराव कधीच सोडला नाही. रोज सहा-सात तास सराव करीत त्याने ‘आयएम’ किताब मिळविला. ही कामगिरी करणारा तो देशातील सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला. आयुष्यात अशा घटना घडत असतात त्याचे मला शल्य नाही. खंत नाही. मला पुढे जायचे आहे, अशा शब्दांत तो आपल्या भविष्यावर भाष्य करतो. यासाठी त्याला पालकांचाही जबरदस्त पाठिंबा आहे. आदिलचे वडील इंडियन आॅइलमध्ये अधिकारी आणि आई शिक्षिका आहे.बुद्धिबळाप्रती मुलाची आवड आणि या खेळातील त्याची जिद्द पाहाता आपण त्याला पूर्ण सहकार्य करीत असल्याचे त्याच्या आईने सांगितले. दरम्यान, आदिलने २०१५ आणि २०१६ मध्ये आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करीत दक्षिण कोरिया आणि मंगोलिया येथील या स्पर्धेत भारताला पदके मिळवून दिली होती.