लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : न्यूझीलंडवर 119 धावांनी दणदणीत विजय मिळवत इंग्लंडने उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. इंग्लंडने न्यूझीलंडपुढे विजयासाठी 306 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 186 धावांवर आटोपला आणि इंग्लंडने विजयासह उपांत्य फेरी गाठली.
सलामीवीर जॉनी बेअरस्टोवने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावत चांगला पाया रचला. पण यावर साजेसा कळस मात्र इंग्लंडच्या फलंदाजांना चढवता आला नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचे फलंदाज एकामागून एक धारातीर्थी पडत गेले आणि त्यांना न्यूझीलंडपुढे 306 धावांचे आव्हान ठेवता आले. बेअरस्टोव खेळत असताना इंग्लंड चारशे धावांच्या जवळपास जाईल, असे वाटत होते.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे जॉनी बेअरस्टोव आणि जेसन रॉय यांनी दाखवून दिले. या दोघांनी इंग्लंडसाठी 123 धावांची सलामी दिली. रॉयच्या रुपात इंग्लंडला पहिला धक्का बसला. रॉयने आठ चौकारांच्या जोरावर 61 धावांची खेळी साकारली.
रॉय बाद झाल्यावरही बेअरस्टोवने दमदार फटकेबाजी सुरुच ठेवत या सामन्यातही शतक झळकावले. भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यातही बेअरस्टोवने शतक झळकावले होते. बेअरस्टोवचे हे सलग दुसरे शतक ठरले. या सामन्यात बेअरस्टोवने 15 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 106 धावांची खेळी साकारली. शतक झळकावल्यावर मात्र बेअरस्टोवला जास्त धावा करता आल्या नाही. बेअरस्टोव बाद झाल्यावर इंग्लंडचा डाव गडगडायला सुरुवात झाली. बेअरस्टोव बाद झाला तेव्हा इंग्लंडची 31.4 षटकांत 3 बाद 206 अशी स्थिती होती. त्यानंतर इंग्लंडच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्याचे पाहायला मिळाले.
Web Title: ICC World Cup 2019: England win over New Zealand and enters in semifinals
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.