लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : रोमहर्षक ठरलेल्या लढतीत यजमान इंग्लंडने सर्वाधिक चौकाराच्या मदतीनं न्यूझीलंडवर विजय मिळवून वर्ल्ड कप विजयाचा दुष्काळ संपवला. इंग्लंडने प्रथमच वर्ल्ड कप जिंकण्याचा मान पटकावला. यापूर्वी तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही इंग्लंडला जेतेपदाचा चषक उंचावता आला नव्हता. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने ही ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली. निर्धारीत 50 षटकांत आणि त्यानंतर सुपरओव्हरमध्येही सामना बरोबरीत सुटला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमानुसार ( आयसीसी) सर्वाधिक चौकार मारणारा संघ विजयी ठरतो आणि म्हणून जेतेपदाचा मान इंग्लंडला मिळाला. न्यूझीलंडच्या या पराभवात त्यांच्याच देशात जन्मलेला खेळाडू जबाबदार ठरला.. कोण आहे तो?
इंग्लंडने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडसमोर विजयासाठी 16 धावांचे लक्ष्य ठेवले. त्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडला अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, परंतु मार्टिन गुप्तील धावबाद झाला अन् सामना पुन्हा बरोबरीत सुटला. या सामन्यात बेन स्टोक्सने जीगरबाज खेळी केली. त्यानं 98 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकार लगावून 84 धावांची खेळी केली. शिवाय सुपर ओव्हरमध्ये त्यानं जोस बटलरला उत्तम साथ देत किवींसमोर 16 धावांचे लक्ष्य ठेवले. आता तुम्हाला हे सांगितलं तर खरं वाटणार नाही की स्टोक्सचा मुळचा न्यूझीलंडचा आहे. न्यूझीलंड येथील ख्राईस्टचर्च येथील त्याचा जन्म आहे. 4 जून 1991चा त्याचा जन्म. वयाच्या 12 व्या वर्षी तो इंग्लंडला स्थायिक झाला आणि येथूनच त्याच्या क्रिकेटला सुरुवात झाली.