लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यजमान इंग्लंडच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या जेसन रॉयला दुखापतीमुळे दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. त्यानंतर तो मैदानावर परतला नाही. याच सामन्यात कर्णधार इयॉन मॉर्गनलाही पाठीच्या दुखापतीमुळे मैदान सोडावे लागले होते. पण, तो दुखापतीतून सावरत असून पुढील 24 तासांत त्याच्या खेळण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल.इंग्लंडचा संघ चार सामन्यांत तीन विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. मंगळवारी त्यांच्यासमोर अफगाणिस्तानचे आव्हान आहे, परंतु या सामन्यात 28 वर्षीय रॉय खेळणार नाही. त्याशिवाय शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही तो खेळणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत दुखापतीमुळे त्याला माघारी जावे लागले होते आणि त्याचा MRI रिपोर्ट काढण्यात आला. त्यात त्याला दुखापतीतून सावरण्यासाठी आठवडाभर विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. रॉयने तीन डावांत 71.66 च्या सरासरीनं 215 धावा केल्या आहेत. त्यात बांगलादेशविरुद्धच्या 153 धावांच्या खेळीचा समावेश आहे.मॉर्गनची दुखापत गंभीर नसून पुढील 24 तास तो वैद्यकीय निगराणीत राहणार आहे. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्याच्या खेळण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. मॉर्गनने 3 डावांत 33.66च्या सरासरीनं 101 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यानं 57 धावा केल्या होत्या.