- सुनील गावस्कर लिहितात...
सध्या सुरू असलेल्या विश्वकप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान राऊंड रॉबिन लीगमधील सर्वांत मोठी लढत खेळली जाणार आहे. यजमान इंग्लंड स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी संघर्ष करीत आहे तर भारतीय संघ शानदार क्रिकेट खेळत आहे. टीम इंडिया विश्वकप २००७ मध्ये आॅस्ट्रेलियाप्रमाणे अपराजित राहत विश्वचॅम्पियन होण्याच्या दिशेने आगेकूच करीत असल्याचे वाटत आहे. गेल्या लढतीत माजी विजेत्या विंडीजविरुद्ध भारताने छोट्या लक्ष्याचा बचाव करताना विजय नोंदवला. नक्कीच या विजयात भारतीय गोलंदाजांचे योगदान महत्त्वाचे ठरले. भारतासाठी चिंतेचा विषय चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील फलंदाजी ठरला आहे. विजय शंकर सलग दोन सामन्यात (साधारण संघांविरुद्ध) मिळालेल्या संधींचा लाभ घेण्यात अपयशी ठरला. तीच स्थिती केदार जाधवची आहे. जाधवचा मजबूत पक्ष म्हणजे त्याने विश्वकप स्पर्धेपूर्वी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत संघाची स्थिती निराशाजनक असताना दोनदा शतके ठोकली होती.भारताने या महत्त्वाच्या लढतीपूर्वी ‘विजयी कॉम्बिनेशन’मध्ये बदल करायला हवा ? आघाडीच्या फळीतील शिखर धवनसारख्या महत्त्वाच्या फलंदाजाला दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतर त्याच्या स्थानी के. एल. राहुलला बढती देण्यात आली आहे. पहिल्या तीन विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर भारतीय डाव गडगडण्याचा धोका आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तीनपैकी दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कर्णधार कोहलीला संयमी फलंदाजी करीत डाव सावरावा लागला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्ध संघात बदल न करता शंकर व जाधव यांना संघात कायम राखायला हवे आणि त्यानंतर बांगलादेश व श्रीलंका यांच्यासारख्या साधारण प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध नवे प्रयोग करता येईल.इंग्लंडविरुद्ध छोट्या धावसंख्येचा बचाव करणे सोपे नाही. इंग्लंडची फलंदाजी मजबूत आहे. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना किमान ४० व्या षटकापर्यंत फलंदाजी करण्याच्या विचार करावा लागेल. या लढतीत इंग्लंड संघ चमकदार कामगिरी करण्याची कुठलीही संधी गमावणार नाही.संघाच्या यशाची भिस्त फलंदाजीवर अवलंबून राहील. त्यांचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यासाठी प्रयत्नशील असतील. इंग्लंडचे तिन्ही पराभव लक्ष्याचा पाठलाग करताना झाले आहेत. भारतीय थिंक टँक याबाबत विचार करीत आहे. स्पर्धेपूर्वी जेतेपदाचा दावेदार मानल्या जाणारा यजमान संघ सध्या आॅक्सिजनवर आहे. त्यांचा मास्क काढण्यात येईल किंवा त्यांची वाटचाल पुढे सुरू राहील, याचा निर्णय रविवारी रात्री (भारतात) सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.