लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वेस्ट इंडिज संघाने सोमवारी झालेल्या लढतीत श्रीलंकेला कडवी टक्कर दिली. 338 धावांचा पाठलाग करताना विंडीजने 315 धावांपर्यंत मजल मारली. हा सामना विंडीजने गमावला असला तरी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. याच सामन्याचे उदाहरण देत इंग्लंडचा माजी खेळाडू मायकल वॉन याने टीम इंडियावर निशाणा साधला आहे. मोठे लक्ष्य डोळ्यासमोर असूनही न खचता त्याचा पाठलाग करण्याचे प्रयत्न कस्र करावे, हे विंडीजकडून शिकावे असा टोमणा वॉन याने लगावला.
ऱविवारी इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाला 31 धावांनी पराभव पत्करावा लागला. 337 धावांचा पाठलाग करताना भारताला 306 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. शेवटच्या दहा षटकांत भारताकडून विजयासाठी फार प्रयत्न झाल्याचे दिसले नाही. त्यावरुन सोशल मीडियावर भरपूर चर्चा- टीका झाली. माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही चांगलाच समाचार घेतला. त्यात आता वॉनच्यी भर पडली आहे. विंडीजच्या खेळीचे समालोचक हर्षा भोगलेने कौतुक केले. त्याने ट्विट केले की," विंडीजच्या प्रेमात पडलो. लक्ष्य आवाक्याबाहेर आहे हे माहित असूनही त्यांनी अखेरपर्यंत जिद्द सोडली नाही."