लॉर्ड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : विश्वचषकाचा अंतिम सामना चांगलाच रंगतदार झाला. विश्वचषकाचा निर्धारीत 50 षटकांचा सामना टाय झाला. त्यानंतर झालेली सुपर ओव्हरही टाय झाली. पण या सामन्यात सर्वाधिक चौकार लगावल्यामुळे इग्लंडला विजेतेपद देण्यात आले. पण सुपर ओव्हरमध्ये झालेला हा पराभव न्यूझीलंडचा मुख्य खेळाडू विसरू शकलेला नाही.
या सामन्यातील शंभराने षटक न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने टाकले होते. त्यानंतर सुपर ओव्हरही बोल्टनेच टाकली. या दोन्ही षटकांमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला.
आता न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला आहे. त्यामुळे खेळाडू आता विश्रांती घेत आहेत. आपल्या कुटुंबियांबरोबर ते काही काळ व्यतित करत आहेत. पण सुपर ओव्हरमध्ये झालेला पराभव बोल्टच्या चांगल्या जिव्हारी लागला आहे. या पराभवातून तो स्वत:ला अजूनही बाहेर काढू शकलेला नाही.
याबाबत बोल्ट म्हणाला की, " सुपर ओव्हरमध्ये झालेला पराभव मी अजूनही विसरू शकलेलो नाही. मी चाहत्यांना निराश केले आहे. यासाठी मी चाहत्यांची माफी मागतो."