मँचेस्टर, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. 240 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 221 धावांत माघारी परतला आणि किवींनी 18 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात महेंद्रसिंग धोनीची विकेट ही वादाच्या कचाट्यात अडकली. धोनी धावबाद झाला तो नो बॉल असल्याची बरीच चर्चा रंगली... अखेरच्या पॉवर प्लेमध्ये केवळ पाच खेळाडू सर्कलबाहेर असल्याचा नियम असताना न्यूझीलंडचे सहा खेळाडू बाहेर होते. पण, पंचांना ते दिसले नाही. जर पंचांनी आपली कामगिरी चोख बजावली असती तर धोनी बाद झाला नसता आणि भारत जिंकला असता, अशीही मतं व्यक्त करण्यात आली. पण, नेमकं काय घडलं?
नक्की वाद काय?आयसीसीच्या नियमानुसार 41 ते 50 षटकांत घेण्यात येणाऱ्या तिसऱ्या पॉवरप्लेमध्ये केवळ पाच खेळाडू सर्कलबाहेर उभे करता येऊ शकतात. पण, ज्यावेळी धोनी बाद झाला तेव्हा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आणि त्यात सहा खेळाडू सर्कलबाहेर उभे असताना दिसत होते. थर्ड मॅन, डीप फाईन लेग, डीप पॉईंट, डीप स्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लाँग ऑन असे सहा खेळाडू बाहेर होते. त्यामुळे अंपायरच्या नजरचुकीमुळे धोनी बाद झाल्याचा आरोप होऊ लागला.