- स्वदेश घाणेकररविवारची सर्व तयारी झालीय ना?... अरे झालीय का काय विचारतोस, सर्व आणलं आहे. खाण्याची अन् बाकीचीही सगळी सोय केली आहे... बरं, ते शेवटी फोडायलाा शॅम्पेन आणि फटाकेही आणलेस ना? हो हो, सर्व तयारी झालीय... बरं, आपण दोघं धरून १५ जण असतील ना?? अर्थातच. दिवसच महत्त्वाचा आहे ना भाऊ... खायचं काय तेही आधीच विचारून घेतोय... त्या दिवशी टीव्हीसमोरून हलणार नाय म्हणजे नाय( ट्रेनमध्ये मस्त गप्पा रंगलेल्या. जणू घरी मोठा कार्यक्रमच आहे.)
तिसऱ्या सीटवरचा मित्र या दोघांचे संवाद ऐकतोय... हावभाव पाहतोय... सगळं कळत असूनही तो मुद्दाम विचारतो. अरे, कसलं प्लॅनिंग करताय एवढं? काहीतरी जंगी सेलिब्रेशन दिसतंय रविवारी! त्यावर त्याची खिल्ली उडवत दोघंही ख्यॅ ख्यॅ हसतात. कुठल्या जगात राहतोस रे तू? रविवारी 'महायुद्ध' आहे, क्रिकेटमधलं महायुद्ध... भारत विरुद्ध पाकिस्तान... यावेळी सातव्यांदा लोळवायचं आहे त्यांना... व्यंकटेश प्रसादने आमीर सोहेलच्या उडवलेल्या दांड्या, सचिनने रावळपिंडी एक्स्प्रेसची उतरवलेली मस्ती, २०१५ मध्ये विराटने ठोकलेली सेन्चुरी सगळं असं डोळ्यासमोर आहे रे... यावेळीही मौके पे चौका आपली विराटसेनाच मारणार... त्याच्याच जल्लोषाची तयारी करतोय...
हे ऐकून तिसरा मित्र गालातल्या गालात हसतो. आता बोलण्याचा 'मौका' त्याचा असतो. अरे, असे कसे रे तुम्ही? भारताने वर्ल्ड कप स्पर्धेवर बहिष्कारच घातला पाहिजे, पाकिस्तानविरुद्ध खेळताच कामा नये, आयसीसीनेच पाकिस्तानसाठी दारं बंद करावीत, हे सगळं तुम्हीच ४-५ महिन्यापूर्वी तावातावाने बोलत होतात ना!... मग आता काय झालं?...
दोघंही निरुत्तर. एकमेकांची तोंडं पाहत राहतात.भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी येत्या रविवारी म्हणजे १६ जूनला मॅंचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर एकमेकांविरोधात खेळणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत हे सख्खे शेजारी; पण पक्के वैरी सातव्यांदा एकमेकांचा सामना करणार आहेत. इतिहास आणि भारतीय संघाची सध्याची कामगिरी पाहता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ बाजी मारेल हे नक्की आहे. पण, १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर हा सामना होऊ नये, भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, स्पर्धेवरच बहिष्कार घालावा अशी मागणी अनेक क्रिकेट चाहते करत होते.
दोन गुण नाही मिळाले तरी चालेल; देशभक्ती महत्त्वाची, अशा तीव्र भावना सोशल मीडियावर व्यक्त होत होत्या. पण आता हीच मंडळी भारत- पाकिस्तान सामन्यासाठी एखाद्या सणाप्रमाणे तयारी करत आहेत. या देशात क्रिकेट हा खेळ महत्त्वाचा आहे, हे जगजाहीर आहे. पण, या खेळाच्या वेडापुढे देशप्रेमही तकलादू आहे की काय, असा प्रश्न कुणी विचारल्यास काय उत्तर द्यायचं? अर्थात, पुलवामा हल्ल्यानंतर, पाकिस्तानला मैदानावर नमवून जवानांच्या बलिदानाला आदरांजली द्या, असं म्हणणाराही एक वर्ग होता. पण त्यांची संख्या कमी होती. आता सगळेच पार्टी बदलतील हे नक्की.
या पार्श्वभूमीवर, क्रिकेट आणि राजकारण हे वेगवेगळे ठेवलेलेच बरं, हे पक्कं झालंय. अन्यथा असे तकलादू देशभक्त गल्लीगल्लीत तयार होत राहतील. एखादा हल्ला झाला की सोशल मीडियावरून पाकिस्तानला शिव्यांची लाखोली वाहायची आणि नंतर पलटी मारायची, हे वागणं बरं नाही!