लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत पाकिस्तानला 105 धावांत सर्वबाद केले. त्यानंतर ख्रिस गेलच्या अर्धशतकाच्या जोरावर त्यांनी हे आव्हान सात विकेट्स आणि 218 चेंडू राखून पूर्ण केले. या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदवर जोरदार टीका सुरू झाली आहे. रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने तर सर्फराजला ढेरपोट्या म्हणून हिणवलं.
तो म्हणाला,''सर्फराज अहमद नाणेफेकीला आला त्यावेळी त्याचे सुटलेलं पोट आणि लटकलेलं गाल पाहून आश्चर्य वाटलं. असा अनफिट कर्णधार मी पहिल्यांदाच पाहिला. त्याला हालचाल करताही येत नव्हती आणि यष्टिमागेही तो अडखळत होता.'' वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आंद्रे रसेलने पाकिस्तानच्या सलामीवीरांना माघारी पाठवून विंडीजला मोठे यश मिळवून दिले. फाखर जमान व बाबर आजम यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. ओशाने थॉमसने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. जेसन होल्डरनेही तीन विकेट घेतल्या. विंडीजने 105 धावांचे माफक लक्ष्य 13.4 षटकांत 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. ख्रिस गेलने 34 चेंडूंत 50 धावा चोपल्या. निकोलस पूरणने 19 चेंडूंत 34 धावांची नाबाद खेळी केली. विश्वचषकात ख्रिस गेलने रचला इतिहासगेलने या सामन्यात ३४ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ५० धावांची खेळी साकारली. या खेळीसह गेलने एक विक्रम रचला आहे. या सामन्यापूर्वी गेल आणि एबी डिविलियर्स हे दोघे विश्वचषकात ३७ षटकार ठोकणारे अव्वल फलंदाज होते. विश्वचषकातील सर्वाधिक षटकार लगावणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये हे दोघे संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होते. पण या सामन्यात तीन षटाक लगावत गेलने एबी डिविलियर्सला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर करत इतिहास रचला आहे.