लंडन, आयसीसी वर्ल्डकप 2019 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना युद्धासारखा असतो, असे म्हणतात. वर्ल्डकपमध्ये तर हा सामना एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो. आतापर्यंतच्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने भारताला एकदाही पराभूत केलेले नाही. या गोष्टीचा धसका पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही (पीसीबी) घेतला आहे. कारण जोपर्यंत भारताचा सामान होत नाही, तोपर्यंत कुटुंबियांबरोबर राहता येणार नाही, असा निर्णय पीसीबीने घेतला आहे.
वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यामध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. यावेळी पाकिस्तानच्या खेळाडूंचे कुटुंब त्यांच्याबरोबर राहत होते. पण या मालिकेत पाकिस्तानला इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव पत्करावा लागला होता. या गोष्टीमधून पीसीबीने काही तरी धडा घेतला आहे, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यानंतरच पाकिस्तानच्या खेळाडूंना आपल्या कुटुंबियांबरोबर राहता येणार असल्याचे पीसीबीने सांगितल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल, अंतिम 15 शिलेदार जाहीर
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजीरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने वर्ल्ड कप चमूत दोन महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान संघाच्या निवड समितीचे प्रमुख इंजमाम उल हक यांनी सोमवारी पाकिस्तानचा 15 जणांचा अंतिम संघ जाहीर केला. पाकिस्तानने याआधी जाहीर केलेल्या संघातून जुनैद खान व फहीम अशरफ यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे.
''इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत आमच्या गोलंदाजांना सपशेल अपयश आले. त्यामुळे वर्ल्ड कप संघात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,''अशी कबुली इंजमाम उल हकने दिली.
पाकिस्तानचा संघ : फखर जमान, इमाम-उल-हक, आसीफ अली, मोहम्मह हाफीज, बाबर आझम, सर्फराज अहमद ( कर्णधार), हॅरिस सोहेल, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, मोहम्मद हसनैन.