नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : येत्या 30 मे पासून सुरू होणाऱ्या क्रिकेटच्या महासंग्रामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचे नाणे खणखणीत वाजेल, असा अनेकांना विश्वास आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. त्यापाठोपाठ यजमान इंग्लंडचा क्रमांक येतो. मात्र, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याचे मत वेगळे आहे. त्याच्यामते यंदाचा वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियाचा संघ जिंकेल. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत झाला आहे आणि त्यामुळे त्यांच्या जेतेपद पटकावण्याच्या आशाही उंचावल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालण्यात आली आहे. वॉर्नर आणि स्मिथ यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1 वर्षांची बंदी पूर्ण करून पुनरागमन केले आहे. चेंडू कुरतडण्या प्रकरणी या दोघांवर एका वर्षांची बंदी घालण्यात आली होती. उस्मा ख्वाजा आणि अॅरोन फिंच यांनाही सूर गवसलेला आहे. त्यात स्मिथ व वॉर्नरमुळे ऑस्ट्रेलियाची फलंदाजी आणखी मजबूत झाली आहे. शिवाय संघात जेसन बेहरेनडॉर्फ आणि मार्कस स्टॉइनिस हे उत्तम अष्टपैलू खेळाडू आहेत. वेगाचा मारा सांभाळण्यासाठी मिचेल स्टार्कच्या सोबतीला पॅट कमिन्स आहेच.
त्यामुळे गंभीरने जेतेपदाच्या दावेदारांत भारत व इंग्लंडला दुसऱ्या स्थानावर ठेवले आहे. तो म्हणाला,''ऑस्ट्रेलिया दावेदारांत आघाडीवर असेल. अंतिम फेरीत ते नक्की खेळतील, परंतु फायनलमधील दुसरा दावेदार हा भारत किंवा इंग्लंड यांच्यापैकी एक असेल. इंग्लंडचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यांच्याकडे बेन स्टोक्स व मोईन अलीसारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत.''
भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेचा ( 5 जून) करेल, तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे दक्षिण आफ्रिका ( 30 मे) आणि अफगाणिस्तान ( 1 जून) यांच्याशी भिडतील.
टीम इंडियात एक गोष्ट सगळ्यात भारी; त्यामुळेच पक्की वर्ल्ड कप दावेदारी; द्रविडचं लॉजिक
वर्ल्ड कपमध्ये सर्वच संघ तगडे फलंदाज घेऊन मैदानावर उतरतील. त्याला भारतीय संघ अपवाद नक्कीच नसेल, परंतु इतरांपेक्षा भारतीय संघ एक पाऊल पुढे राहणार आहे. कारण, इतर संघांच्या तुलनेत भारताकडे विकेट घेणारे गोलंदाज आहेत आणि हीच भारतीय संघाची ताकद आहे. त्यामुळेच जेतेपदाच्या दावेदारांच्या शर्यतीत भारतीय संघ आघाडीवर आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
''गतवर्षी भारत A संघ येथे दौऱ्यावर आला होता आणि त्यावेळी मोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या. वर्ल्ड कपमध्येही धावांचा पाऊस पडेल. अशा परिस्थितील गोलंदाजांनी मधल्या षटकांत विकेट घेत राहणे महत्त्वाचे आहे. आपल्याकडे सक्षम गोलंदाज आहेत, त्यासाठी स्वतःला नशीबवान समजले पाहिजे. जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल... हे गोलंदाज आपल्याला विकेट मिळवून देत राहणार. मधल्या षटकांत प्रतिस्पर्धी संघाला धक्के देण्यात यशस्वी होणाऱ्या संघाला विजयाची संधी अधिक असणार आहे,''असे द्रविडने सांगितले.
Web Title: ICC World Cup 2019: Former Indian opener Gautam Gambhir has picked Australia as his favourites to win the 2019 ICC World Cup
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.