साउदॅम्पटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघाला वर्ल्ड कपमध्ये खेळताना पाहण्याची प्रतीक्षा अवघ्या काही तासांत संपणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होऊन 6 दिवस झाले, तरीही हवे तसे वातावरण निर्माण झालेले नाही. जगभरातील चाहते विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाच्या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहे. जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर असलेल्या टीम इंडियावर पहिल्या सामन्यापूर्वीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. फुटबॉल वर्ल्ड कप विजेत्या जर्मन संघातील दिग्गज खेळाडू थॉमस म्युलरनेही कोहलीला पहिल्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कोहलीनंही त्यावर प्रतिक्रिया नोंदवली.
2010च्या ब्राझील वर्ल्ड कप स्पर्धेतील कांस्यपदक आणि 2014च्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या जर्मन संघातील सदस्य म्युलरने म्हटले की,'' क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना शुभेच्छा. थरारक सामने पाहायला मिळतील अशी आशा करतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीसाठी विषेश शुभेच्छा. त्याने यापूर्वी अनेकदा जर्मन फुटबॉल संघाला पाठींबा दिला आहे.''
कॅप्टन कोहली पहिल्याच सामन्यात करणार भीमकाय पराक्रम?साउदम्टन येथील दी रोज बाऊल स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्याच सामन्यात कोहलीला दोन विक्रम नोंदवण्याची संधी आहे. कोहलीची प्रत्येक खेळी हा एक वेगळा विक्रमच असतो... यामुळेच आतापर्यंत त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेतही त्याच्याकडून अशाच विक्रमी खेळींची अपेक्षा आहे. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आफ्रिकेला नमवल्यास कर्णधार म्हणून कोहली विजयाचे अर्धशतक पूर्ण करेल. त्याच्या नावावर आतापर्यंत 49 विजय आहेत.
याशिवाय कोहलीला आणखी एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात त्याला वन डे क्रिकेटमधील 11 हजार धावा करण्याची संधी आहे. त्यासाठी त्याला 157 धावा कराव्या लागतील. असे केल्यास सचिन तेंडुलकर ( 18426) आणि सौरव गांगुली ( 11221) यांच्यानंतर 11 हजार धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. कोहलीनं 227 वन डे सामन्यांत 59.57च्या सरासरीनं 10843 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 41 शतकं आणि 49 अर्धशतकांची नोंद आहे.