दुबई, आयसीसी वर्ल्ड कप : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्ड कप विजयाच्या निर्धाराने लंडनमध्ये दाखल होणार आहे. जगातील दहा तगड्या संघांमध्ये ही जेतेपदाची चुरस रंगणार आहे आणि भारत हा प्रबळ दावेदार समजला जात आहे. वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( आयसीसी) जाहीर केलेल्या वन डे क्रमवारीत भारताचा कर्णधार कोहली आणि प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यांनी अव्वल स्थान कायम राखले आहे. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर भारताच्या चाहत्यांना खूशखबर मिळाली आहे.
वन डे फलंदाजांमध्ये सर्वाधिक 890 गुणांसह कोहली अव्वल स्थानावर आहे. भारताताच रोहित शर्मा ( 839) दुसऱ्या, तर न्यूझीलंडच्या ( 831) तिसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजच्या शाय होपने सातत्यपूर्ण कामगिरी करून चौथ्या स्थानावर झेप घेतली. त्याच्या खात्यात 808 गुण जमा असून त्याने दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉक ( 803) याला मागे टाकले. गोलंदाजांत बुमराह 774 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट ( 759) आणि अफगाणिस्तानचा रशीद खान ( 726) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. अव्वल दहा गोलंदाजांत भारताचे कुलदीप यादव व युजवेंद्र चहल अनुक्रमे 7व्या व 8व्या स्थानावर आहेत.