नवी दिल्ली, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होऊन दोन दिवस झाले आणि जेतेपदाचा प्रबळ दावेदार भारतीय संघ पहिला सामना 5 जूनला खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतासमोर पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. भारतीय संघाला शुभेच्छा देण्यासाठी गुगल Duo या व्हिडीओ कॉलिंग अॅपने एक व्हिडीओ बनवला आहे. पण, हा व्हिडीओ चुकून जगभरातील युजर्सना पाठवला आणि त्यावर स्पष्टीकरण देण्याची नामुष्की गुगलवर ओढावली. एखाजा इव्हेंट किंवा विशेष दिवशी गुगल Duo युजर्सना असे व्हिडीओ पाठवत असतो.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या निमित्ताने गुगलने कर्णधार विराट कोहलीचा एक व्हिडीओ भारतातील Duo युजर्सना पाठवण्याची योजना आखली होती. पण, तो पाठवताना गुगलकडून एक चूक झाली आणि तो व्हिडीओ जगभरात पोहोचला आणि शिवाय त्याचा नोटीफिकेशनही गेले. त्यानंतर जगभरातील Duo युजर्सने हा व्हिडीओ त्यांना का पाठवला, असा सवाल गुगलला केला.