मुंबई, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघ बुधवारी रवाना होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. 2011नंतर प्रथमच वर्ल्ड कप उंचावण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. लंडनला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे. 1992नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धा राऊंड रॉबीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा यापूर्वीच्या स्पर्धांपेक्षा अधिक आव्हानात्मक असल्याचे कोहलीला वाटते. तो म्हणाला,''या फॉरमॅटमुळे वर्ल्ड कपमधील चुरस अधिक वाढवली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली आहे. 2015नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रत्येक सामना हा संपूर्ण ताकदीनं आणि शंभर टक्के योगदान देऊन खेळण्याची गरज आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्ट्या कशा आहेत यापेक्षा तणाव कसा हाताळतो, हे महत्त्वाचे आहे.''
पाहा व्हिडीओ...5 जूनला भारतीय संघ वर्ल्ड कपमध्ये पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.