लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा नेहमी चर्चेचा, उत्सुकतेचा विषय ठरतो. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतही उभय संघांतील सामन्यानं टीआरपीचे सर्व विक्रम मोडले. भारतीय संघानेही दमदार कामगिरी करताना पाक संघाला लोळवून वर्ल्ड कपमधील परंपरा कायम राखली. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांनी हा सामना जिंकला. त्यानंर टीम इंडियावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. भारतातील एका पत्रकाराने केलेल्या ट्विटवर उत्तर देताना पाकिस्तानचा गोलंदाज हसन अलीनं टीम इंडियाला पाठिंबा दिला. पण, टीका होताच त्यानं ते ट्विट डिलिट केलं.
वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानची वाटचाल साजेशी झालेली नाही. इंग्लंडला पराभूत करून धक्कादायक निकाल नोंदवणाऱ्या पाक संघाला त्यानंतर विजय मिळवता आलेला नाही. पाच सामन्यांत त्यांना केवळ 3 गुणाची कमाई करता आलेली आहे आणि संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. भारतीय संघानेही त्यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाच्या या विजयानंतर भारतातील एका महिला पत्रकाराने अभिनंदन करणारे ट्विट केले. त्यावर हसन अलीनं तुमची इच्छा पूर्ण होईल, असे उत्तर दिले. पण, सोशल मीडियावर टीका होताच त्यानं ते ट्विट डिलिट केलं.
पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने वर्ल्ड कप स्पर्धेतील हसन अलीच्या कामगिरीवर सडकून टीका केली आहे. वाघा सीमेवर उड्या मारण्यापेक्षा मैदानावर कर्तृत्व दाखव, असा टोमणा अख्तरनं 24 वर्षीय हसनला मारला होता. रविवारी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात भारताने 89 धावांनी मिळवलेला हा विजय आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात भारतानं 50 षटकांत 5 बाद 336 धावा केल्या, पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 40 षटकांत 302 धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र पाकिस्तानला 40 षटकांत 212 धावाच करता आल्या.
पाकिस्तानला पुढील लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ( 23 जून) सामना करावा लागणार आहे. उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी पाकिस्तानला पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.