ललित झांबरे, आयसीसी वर्ल्डकप 2019 : बाराव्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा सलामी सामना गुरुवार, 30 रोजी यजमान इंग्लंड आणि तगड्या दक्षिण आफ्रिकन संघात आहे. ही लढत तशी काट्याची आहे कारण दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. इंग्लंडने तर गेल्या काही सामन्यात घरच्या मैदानांवर धावांचा रतीब घातला आहे. द ओव्हल मैदानावरची ही लढत तोडीस तोड होईल याचा अंदाज आहे.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सलामी सामन्यांवर आतापर्यंत यजमान संघांचेच वर्चस्व राहिले आहे. यजमान संघाचा समावेश असलेल्या 9 पैकी विश्वचषकाचे सात सलामी सामने यजमानांनी जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिका (2003) व बांगलादेश (2011) हे दोनच सलामी सामना गमावणारे यजमान आहेत. 1979 आणि 1996 च्या विश्वचषक स्पर्धेचा सलामी सामन्यात यजमान संघ अनुक्रमे इंग्लंड व भारत यांचा नव्हता.
विश्वचषक सलामी सामन्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 11 पैकी 9 सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. केवळ 1979 व 1999 चा विश्वचषक सलामी सामनाच नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकला आहे.
2007 पर्यंत तर विश्वचषक सलामी सामन्यात 'टॉस जिंका, मॅच जिंका' अशी स्थिती होती. गेल्या दोन विश्वचषकात मात्र टॉस जिंकणाऱ्या बांगलादेश (2011) व श्रीलंका (2015) यांनी सलामी सामना गमावला आहे.
आतापर्यंतचे विश्वचषक सलामी सामने
वर्ष विजयी पराभूत अंतर
1975 इंग्लंड भारत 202 धावा1979 विंडीज भारत 9 गडी1983 इंग्लंड न्यूझीलंड 106 धावा1987 पाक श्रीलंका 15 धावा1992 न्यूझी. अॉस्ट्रेलिया 37 धावा1996 न्यूझी. इंग्लंड 11 धावा1999 इंग्लंड श्रीलंका 8 गडी2003 विंडीज द. आ. 3 धावा2007 विंडीज पाक 54 धावा2011 भारत बांगला. 87 धावा2015 न्यूझी. श्रीलंका 98 धावा