लॉर्ड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर जाण्याची औपचारिकता अखेर पार पडली. बांगलादेशने आठवी धाव घेताच पाकिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर फेकला गेला. पाकिस्तानने ९ बाद ३१५ धावा केल्या तेथेच त्यांचे आव्हान संपले होते. पण, हा सामना जिंकून किमान सन्मानाने स्पर्धेचा निरोप घेण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात ही शर्यत होती आणि नेट रनरेटच्या आधारे ती किवींनी जिंकली.
बांगलादेशने पाकिस्तानचा मार्ग अडवल्याने उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आहेत यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया. भारत आणि न्यूझीलंड हे चार संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत राहिले आहेत.
ही नेट रनरेटची तफावत आली कुठून ?वर्ल्ड कप स्पर्धेतील दोन्ही संघांचा पहिला सामना आठवा. पाकिस्तानची पराभवानं तर किवींची विजयानं सुरुवात झाली होती. वेस्ट इंडिजने अनपेक्षित निकाल नोंदवत पाकला लाजीरवाणा पराभव पत्करण्यास भाग पाडले होते. पाकिस्तानचा संपूंर्ण संघ १०५ धावांत तंबूत परतला होता आणि विंडीजने हे लक्ष्य १३.४ षटकांत पार केले होते. दुसरीकडे न्यूझीलंडने श्रीलंकेचा डाव १३६ धावांत गुंडाळून १६.१ षटकांत लक्ष्य पार केले होते. याच सामन्यांनी दोन्ही संघांचे नशीब फिरवले.