टौंटन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारत आणि पाकिस्तान या कट्ट प्रतिस्पर्धी संघांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. येत्या रविवारी हे सख्खे शेजारी क्रिकेटच्या मैदानावर एकमेकांना भिडणार आहेत. तत्पूर्वी दोन्ही संघ अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघांचा सामना करणार आहेत. बुधवारी पाकिस्तानचा संघ गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयी लय कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरणार आहे. या सामन्यातही स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांची चाहत्यांकडून हुर्यो उडवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण, पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदनं यानं पाकिस्तानी चाहते तसं वागणार नाहीत, असा विश्वास व्यक्त केला. तो करताना त्याच्या बोलण्यातून भारतीय चाहत्यांकडे टीकेचे बाण सोडण्यात आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी चाहत्यांची मनं जिंकली, परंतु विराट कोहलीच्या एका कृतीनं ऑसी चाहत्यांनाही आपलंसं केलं. चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर बंदीची कारवाई झाली होती. स्मिथ व वॉर्नर एका वर्षाच्या बंदीच्या कारवाईनंतर राष्ट्रीय संघात परतले, परंतु चाहत्यांच्या मनात त्यांच्याबद्दलचा राग अजूनही कायम आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत त्याची प्रचिती वारंवार येत आहे. स्टेडियमवर उपस्थित चाहते स्मिथ व वॉर्नर यांची हुर्यो उडवत आहेत.
भारतीय चाहत्यांनाही तसं करणं आवरलं नाही. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात ओव्हल मैदानावर भारतीय चाहत्यांचीच संख्या अधिक होती आणि त्यांनी कांगारूंच्या खेळाडूंना डिवचण्याची संधी दवडली नाही. क्षेत्ररक्षण करत असताना भारतीय चाहते स्मिथची हुर्यो उडवत होते. त्यांच्या या कृत्यावर कोहली नाराज झाला आणि त्यानं चाहत्यांना तसं न करण्याचं आवाहन केलं. कोहलीच्या या कृतीनं सर्वांचीच मनं जिंकली. कोहलीच्या या कृतींची सर्वत्र स्तुती झाली.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या लढतीत पाकिस्तानचे चाहत्यांनी स्मिथ व वॉर्नरचा हुर्यो उडवल्यास काय करशील, असा प्रश्न सर्फराजला विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,''पाकिस्तानचे क्रिकेट चाहते तसं वागतील असं मला वाटत नाही. ते क्रिकेटवर प्रेम करतात. त्यांना पाठिंबा द्यायला आवडतो आणि त्यांचा खेळाडूंवर जीव आहे.''