लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडने त्यांच्या वर्ल्ड कप संघात दोन मोठे बदल केल्याची घोषणा मंगळवारी केली. इंग्लंडच्या संघात जोफ्रा आर्चर आणि लिएम डॉसन यांना संधी देण्यात आले आहे. आर्चर हा या संघातील आश्चर्याची निवड ठरली. संभाव्य संघातही त्याला स्थान देण्यात आले नव्हते, परंतु त्याने पाकिस्तानविरुद्धच्या तीन वन डे सामन्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली. डेव्हीड विलीच्या जागी त्याला संघात संधी मिळाली. जेम्स व्हिन्सीचाही संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. वर्ल्ड कप संघात स्थान पटकावल्यानंतर आर्चरला भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या विकेटचे वेध लागले आहेत.
बार्बाडोसमध्ये जन्मलेल्या जोफ्राला वर्ल्ड कप संघात स्थान न दिल्यास इंग्लंडची मोठी चूक ठरेल, असे विधान अनेक माजी खेळाडूंनी केले होते. त्यातूनच हा किती उपयुक्त खेळाडू आहे, याची प्रचिती येते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांच्या पात्रता निकषात बदल केल्यामुळे हे शक्य झाले. नियमानुसार इंग्लंडमध्ये न जन्मलेला, परंतु येथे तीन वर्ष वास्तव्यास असलेला खेळाडू इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व करू शकतो. याआधी वास्तव्याची अट सात वर्ष होती. नव्या नियमाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2019 पासून होणार झाली. वर्ल्ड कप संघातील निवडीनंतर आर्चर म्हणाला,''वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीची विकेट घ्यायला मला आवडेल. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये हे कसर राहून गेली होती.''
23 वर्षीय आर्चर 2015 पासून ससेक्स क्लबचे प्रतिनिधित्व करतो आणि जगातील बऱ्याच ट्वेंटी-20 लीगमध्ये त्याने आपली छाप पाडली आहे. गतवर्षी इंडियन प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाने त्याला 7.2 कोटी रुपयांत चमूत दाखल करून घेतले होते. आर्चर हा बिग बॅश लीग आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळतो. त्याने ऑक्टोबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजच्या 19 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याने ब्रिटीश पासपोर्ट मिळवले आणि 2015 साली तो लंडनमध्ये स्थायिक झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 28 सामन्यांत 131 विकेट्स घेतल्या आहेत, शिवाय 1003 धावाही कुटल्या आहेत.
संघात स्थान मिळाल्याचा आनंद शब्दात सांगू शकत नाहीतो म्हणाला,''गाडी चालवत असताना माझा फोन वाजला. तो कोणाचा आहे, हे न पाहताच मी तो उचलला आणि समोरच्या व्यक्तीनं त्याची ओळख सांगितली. त्यानंतर त्यांनी जे काही सांगितले ते ऐकण्यासाठी माझे कान प्रतीक्षा करत होते. राष्ट्रीय संघात निवड झाल्यापासून प्रत्येकांनी माझे मोठ्या मनानं स्वागत केलं.''